मुंबई/नागपूर - रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून राज्यात राजकीय वादंग सुरू असतााच आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस पुतण्याच्या लसीकरणावरून काँग्रेसच्या निशाण्यावर आले आहेत. फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसने 45 वर्षांपेक्षा कमी वय असतानाही कोरोनाची लस घेतल्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.
![काँग्रेस नेत्याची टीका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/tanmauujpg1_2004newsroom_1618892369_1048.jpg)
काँग्रेसची ट्विटवरून टीका
महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक ट्विट टाकून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. "४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असे असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजपा नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!" असे ट्विट काँग्रेसकडून करण्यात आले आहे. यासोबत तन्मयचा लस घेतानाचा फोटो आणि त्याचा फडणवीस यांच्यासोबतचा फोटोही काँग्रेसने ट्विट केला आहे.
![महाराष्ट्र काँग्रेसचे ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/tanmauu_2004newsroom_1618892369_68.jpg)
काँग्रेस नेत्याचीही टीका
युथ काँग्रेसचे कर्नाटकातील नेते श्रीवत्स यांनीही तन्मय आणि फडणवीसांचे फोटो ट्विट करून लसीकरणावरून भाजपाला लक्ष्य केले आहे. त्यामुळे आता पुतण्याच्या लसीकरणावरून फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावर आल्याचे दिसत आहे.
![केशव उपाध्ये यांचे ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11468372_upadhe.jpg)
तन्मय लांबचा नातेवाईक - उपाध्ये
भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी ट्विट कर तन्मय हा फडणवीस यांचा लांबचा नातेवाईक असल्याचे म्हटले आहे. "@Dev_Fadnavis यांना स्वतःचा प्रभाव वापरायचा असता तर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीला कोरोनाची लस दिली असती. अजूनही त्यांनी तसे केलेले नाही. का उगाच कोण्या लांबच्या नातेवाईकाचे लसीकरण त्यांना चिटकवायचा प्रयत्न करताय? शिवसेनेच्या आमदार,महापौरांनी पात्र नसताना लस घेतलीहोती, त्याचे आधी बोला" असे ट्विट उपाध्येंनी केले आहे.
तन्मय माझा लांबचा नातेवाईक; पुतण्याच्या लसीकरणाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
विधान सभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षांच्या पुतण्याला कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामुळे सध्या फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर हा फोटो डिलीटही करण्यात आला. देशात 45 वर्ष वयोगटापुढील लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. मात्र, तन्मय फडणवीसचे वय 25 असताना लस दिल्याने फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झाले असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र, जर नियमावलीचं उल्लंघन झाले असेल तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे हे माझे ठाम मत आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे.
कोण आहे तन्मय फडणवीस?
तन्मय फडणवीस हा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या आहे तसेच राज्याच्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू आहे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-
'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा
अंध आईच्या हातून निसटला मुलगा, पडला रेल्वे ट्रॅकवर, पॉइंटमनने वाचवला जीव
साताऱ्यातील यवतेश्वर घाटात उडी घेऊन १६ वर्षीय युवतीची आत्महत्या, आधारकार्डवरुन पटली ओळख
लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक
नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला