मुंबई - निवडणुकीमध्ये उमेदवार आणि राजकीय पक्ष प्रचारासाठी विविध पद्धतींचा वापर करतात. असाच वेगळ्या पद्धतीचा प्रचार भायखळा मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यासाठी केला जात आहे. यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी त्यांच्या निखिल नावाच्या धाकट्या मुलाने बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांची मदत घेतली आहे. व्यंगचित्रांचे कॉमिक बुक प्रसिद्ध केले असून त्यामधून आपल्या आईचे काम मतदारांपर्यंत नेवून त्यांचे हृदय परिवर्तन करण्याचा मानस निखिलने केला आहे.
भायखळा मतदार संघात एमआयएमचे आमदार वारीस पठाण प्रतिनिधित्व करत आहेत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २१ ऑक्टोबरला होत आहे. त्यासाठी भायखळ्यामधून वारीस पठाण यांना काँग्रेसकडून मधू चव्हाण, अखिल भारतीय सेनेकडून डॉन अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी तर शिवसेनेकडून यामिनी जाधव या निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघात प्रत्येक निवडणुकीत नवीन आमदार निवडून येत असल्याने या ठिकाणची निवडणूक चुरशीची झाली आहे. त्यामुळे सर्व पक्षीय उमेदवारांनी शेवटच्या दिवसात प्रचारात वेग घेतला आहे.
यादरम्यान शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांचे कार्य मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांच्या निखिल या धाकट्या मुलाने बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमधून प्रेरणा घेत एक कार्टूनवर आधारित कॉमिक बुक बनवले आहे. याबाबत माहिती देताना निखिल जाधव यांनी सांगितले कि, याला पिक्टोरियन लर्निग असे म्हटले जाते. यात सात दिवसांच्या सात स्टोरीज आहेत. त्यात स्तनपान, महिलांना रोजागार देणे, खेळाडूंना कशा प्रकारे प्रेरित केले याची माहिती व्यंगचित्राच्या माध्यमातून दिली आहे.
या पुस्तकात माझी स्वतःची स्टोरी आहे. मी फास्ट ड्राइव्हिंग करायचो, मम्मी मला खूपवेळा थांबवायची, मी तिला बोलायचो तू मला कशी थांबवू शकतेस. ते मनावर घेऊन तिने भायखळा येथे मोफत ड्राइव्हिंग लर्निंगचे क्लासेस सुरु केले. या सत्य घटना आणि आईने केलेली कामे पुस्तकरूपाने प्रसिद्ध करून केली आहेत. प्रत्येक स्टोरी इमोशनली बनवली असल्याने पहिले पान उघडणारा व्यक्ती शेवटच्या पानापर्यंत जाईल अशा स्टोरी यामध्ये आहेत. त्याचे त्यामधून हृदय परिवर्तन नक्कीच होईल असे निखिल जाधव यांनी सांगितले.
बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आहोत -
मी आणि माझा मित्र युवासेना सचिव सिद्धेश जावसकर एकत्र बसलो असताना आम्हाला हि संकल्पना सुचली. आम्ही व्यंगचित काढण्याचा विचार करत होतो. सिद्धेशने पुस्तक काढण्याचे सुचवले. आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिक मधून प्रेरणा भेटली. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा वारसा आम्ही आता पुढे घेऊन जात आहोत असे निखिल जाधव यांनी संगितले.