मुंबई : राज्यात पावसाने हाहाकार माजला आहे. अतिवृष्टी आणि पुराशी निगडीत दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणासह मुंबई, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात अतिवृष्टी व पुराचे थैमान बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुढे यावं आणि तातडीने जशी जमेल तशी मदत करावी, अशा आशयाचं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलं आहे.
राज ठाकरेंचे पत्र"महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी असे आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल, तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोहोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी. महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये" असे पत्र राज यांनी कार्यकर्त्यांना लिहिले आहे.
पावसाचा पुढील अंदाजपुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह पालघर, ठाणे, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मागील 48 तासांत महाबळेश्वरमध्ये तब्बल 1074.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आज सकाळी साडे आठ वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत तब्बल 142.2 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - Maharashtra Floods : राज्यात अतिवृष्टी, पुराचे 54 बळी; पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा