मुंबई - गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानू याने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये मराठी भाषेचा द्वेष करणारं वक्तव्य केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली. दरम्यान, शिवसेना आणि मनसे नेत्यांनी बिग बॉसचा शो बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर तातडीने कलर्स वाहिनीचे संचालन करत असलेल्या वायकॉम १८ या कंपनीने माफीनामा सादर केला आहे. विशेष म्हणजे आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कंपनीकडून माफीनामा पाठवण्यात आला आहे. मात्र, जान सानू यांच्याकडून अद्याप कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही.
वायकॉमचा डबल गेम-
मात्र, ज्या मराठी भाषेसाठी शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली होती, त्या मुद्द्यावरून माफी मागताना वायकॉमने दुहेरी चाल खेळली आहे. जान सानू याच्या मराठी भाषेबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागताना वायकॉम १८ ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंग्रजीतून पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शुद्ध मराठीतून पत्र पाठवून माफी मागितली आहे. त्यामुळे आता समाज माध्यमावर वेगळीच चर्चा रंगु लागली आहे. मुद्दा मराठी भाषेचा असताना वायकॉम१८ कडून दोन वेगवेगळ्या भाषेत माफीनामा सादर करण्यामागे काय हेतू आहे. यावरून आता शिवसैनिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
वायकॉमचा माफीनामा-
या प्रकरणी माफी मागताना, वायकॉमन १८ ने या पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या.आम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोललं गेलं आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत. मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. असे म्हटले आहे.
काय आहे प्रकरण-
बिग बॉस-14’च्या खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तांबोळी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. यावेळी निक्की तांबोळी राहुलशी मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.
यावर मनसे आणि शिवसेना नेते आक्रमक-
मराठी बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आणि अमेय खोपकर यांनी जान सानूला धमकी वजा इशाराच दिला. खोपकर यांनी म्हटले की 'मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजले'
शिवसेनेने सानूची हक्कालपट्टी करण्याची केली होती मागणी-
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही कलर्स वाहिनीच्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या स्पर्धकाची शोमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रीकरण बंद पाडण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही तासांपूर्वी कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील या प्रकरणी माफीनामा सादर केला आहे.