मुंबई - डायरेक्टरेट रेव्हेन्यू ऑफ इंटेलिजन्सच्या मदतीने (डीआरआय) सोमवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक किलो कोकेन पकडण्यात आले. एका महिलेच्या ट्रॉली बॅगमध्ये लपवलेले कोकेन चेक पॉईंटवरील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलेना कासाकतीरा या 43 वर्षांच्या महिलेला नार्कोटिक ड्रग्ज अँड सबस्टन्स अॅक्टच्या कलमांतर्गत अटक झाली आहे. तिला मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आले. यानंतर संबंधित महिलेला 7 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ईथिओपिया - दुबई - मुंबई कनेक्शन
सुविधाजनक हवाई सेवा, कायद्याची मर्यादित अंमलबजावणी आणि कमीतकमी गुन्हेगारी दंड यामुळे इथिओपियातील अदिस अबाबा हा एक लोकप्रिय ट्रांझिट पॉईंट बनला आहे. याबाबत एका अधिकाऱ्यांने माहिती दिली. एडीस अबाबाहून मुंबईकडे दुबईमार्गे जाणाऱ्या या महिलेकडे संशयास्पद वस्तू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोमवारी मुंबईत आंततराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. मात्र प्रतिबंधित ब्लॅक कार्बन पेपरने ही कोकेनची बॅग गुंडाळण्यात आली होती. हे पॅकेज उघडल्याव पांढरी पावडर आढळल्याचे तपासणी अधिकाऱ्याने सांगितले. त्याचे टेस्टींग केल्यानंतर हे कोकेन असल्याने सिद्ध झाले.
एकाच आठवड्यात दुसरी कारवाई
एका आठवड्यात डीआरआय अधिकार्यांकडून दुसऱ्यांदा कोकेन जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी डीआरआय अधिकाऱ्यांनी 502 ग्रॅम कोकेन ताब्यात घेतले होते.