मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात महाराष्ट्र राज्य ऊर्जा कंपनीत व्यवस्थापकीय संचालक असलेल्या ए. शैला यांची व्यवस्थापकीय संचालक हाफकीन मुंबई येथे नियुक्ती केली असून याठिकाणी नियुक्ती झालेलेले कुणाल खेमनार यांच्या आदेशात अंशतः बदल करुन त्यांना पुणे मनपा येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती दिली आहे.
विलास पाटील उर्वरित महाराष्ट्र मंडळाच्या सदस्य सचिव पदावरुन सचिव अन्न व पुरवठा विभाग तर कौस्तुभ दिवेगावकर संचालक भूजल सर्वेक्षण यांची उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.
पुणे येथील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक म्हणून दिवेगावकर यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांनी यापूर्वी लातूर येथे महापालिकेचे आयुक्त म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. दिवेगावकर यांचे मूळ गाव हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील दिवेगाव हे आहे.त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण लातूर येथील केशवराज विद्यालयातून झाले आहे. दरम्यान उस्मानाबाद जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांच्याकडे मात्र कोणती जबाबदारी दिली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.