मुंबई - गोरेगाव आरे ग्रीन झोन आहे. या जागेला मुंबईमधील ऑक्सिजनचे बेट बोलले जाते. भाजप सरकारने या जागेवर झाडे तोडून मेट्रोसाठी कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईत आधीच कमी झाडे आहेत. त्यात कारशेड बांधण्यासाठी हजारो झाडे तोडली जाणार असल्याने कारशेड कांजूरमार्ग येथे बांधले जावे, अशी मागणी केली जात होती. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेड आरेमध्ये बांधले जाणार नाही, कांजूरमार्ग येथेच बांधले जाईल, असे स्पष्ट केल्याने मुख्यमंत्र्यानी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.
मुंबईत मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. त्यासाठी आरेमधील 5 एकर जागेमधील 2700 झाडे तोडली जाणार आहेत. त्यात 2180 झाड तोडण्याला पालिकेची परवानगी , तर 460 झाडाचं पूर्णरोपण करण्याला पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. आरेमधील झाडे तोडायला पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने विरोध केला होता. सत्ताधारी शिवसेनेचा विरोध असताना तत्कालीन आयुक्तांनी भाजपला हाताशी धरून झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यामुळे आरे वाचवण्यासाठी अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. सामाजिक संघटना विरोध करत असताना रात्रीच्या अंधारात हजारो झाडे तोडण्यात आली होती. कारशेड कांजूरमार्गला हलवावे, अशी मागणी गेले कित्येक वर्षे केली जात होती.
तत्कालीन भाजप सरकारने कांजुरमार्गला कारशेडला हलवल्यास जमीन खरेदीसाठी 5 हजार कोटी रुपये खर्च होतील, हा खर्च केल्यास मेट्रोच्या कामाचा खर्च वाढेल असा मुद्दा पुढे केला होता. तर राज्य सरकारमध्ये असलेल्या शिवसेनचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे सरकार सत्तेवर आल्यास आरेमधील कारशेड इतर ठिकाणी हलवू असे आश्वासन दिले होते. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच कारशेड कधी हलवणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यानी कारशेड आरेमध्ये न बांधता कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर बांधले जाईल असे स्पष्ट केले आहे.
निर्णयाचे स्वागत -
मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या निर्णयाबाबत पालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता आरेमध्ये झाडे तोडून कारशेड बांधण्यास शिवसेनेचा विरोध होता. झाडे तोडू नये, अशी भूमिका शिवसेनेने वेळोवेळी घेतली होती. झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीत आला तेव्हा आम्ही विरोध केला होता. कारशेड इतर ठिकाणी बांधावे यासाठी इतरही जागा पाहण्यात आल्या होत्या. त्यात कांजूरमार्ग येथील जागाही होती. याठिकाणी कारशेड बांधल्यास आरेमधील झाडे वाचवता येतील अशी आमची भूमिका होती. आज मुख्यमंत्र्यानी आरेमध्ये होणारे कारशेड कांजूरमार्गला होईल, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयाचे स्वागत करतो, असे जाधव यांनी म्हटले आहे. तर भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता आपण मुख्यमंत्र्यांचे भाषण पूर्ण ऐकले नाही. त्याची माहिती घेऊन नंतर बोलू असे म्हटले आहे.
13 हजार झाडे लावा -
आरेमधील 5 एकर जागेमधील 2700 झाडे तोडली जाणार आहेत. त्यात 2180 झाड तोडण्याला पालिकेची परवानगी , तर 460 झाडाचं पूर्णरोपण करण्याला पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. तर झाडे तोडण्याच्या बदल्यात 13 हजार 110 झाडे 30 दिवसात लावण्याचे आदेश पालिकेने मेट्रो रेल्वेला दिले होते.