मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाउन लागू करण्यात आला. तेव्हापासून राज्यातील दुकाने, शाळा, सर्व मंदिरे, हॉटेल, चित्रपटगृहे, सार्वजनिक ठिकाणे बंद आहेत. तथापि, मागील काही दिवसांपासून इतर बाबी जसजशा खुल्या केल्या जात आहेत, तसतशी मंदिरे उघडण्याची मागणी सातत्याने होत आहे. भाजपा आणि मनसे या दोन प्रमुख पक्षांनी मंदिरे उघडण्याची मागणी लावून धरली आहे. आज राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा, मनसेसह इतर कोणत्याही पक्षांची नावे न घेता 'मंदिरे सुरू करा म्हणायला तुम्हाला काय? जबाबदारी आमच्यावर आहे,' असे म्हणत टोला लगावला. त्यामुळे मंदिरे इतक्यात उघडली जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. तसेच, हॉटेलप्रमाणेच जिमसारखी सार्वजनिक ठिकाणे उघडण्याविषयी आणि त्यासाठी विशेष नियमावलीविषयी विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
'मंदिराच्या विषयावर मी हळूवार जात आहे. काही जण म्हणतात, तुम्ही हे उघडले, ते उघडले नाही. जबाबदारी तुमच्यावर नाही आमच्यावर आहे, त्यापेक्षाही जनतेवर आमचे प्रेम आहे. उगाच तंगड्यात तंगडे घालून, बंद कायम ठेवण्याची आमची मानसिकता नाही' असे ठाकरे म्हणाले. 'आता नवरात्री येत आहे, त्यानंतर दिवाळी आहे. खूप काळजीपूर्वक एक-एक पाऊल टाकावे लागणार आहे. उघडलेल्या दरवाजातून सुबत्ता, समृद्धी आली पाहिजे, कोरोना नको, तरच त्या उघडलेल्या दरवाजाला अर्थ आहे', असे मुख्यमंत्री म्हणाले. मास्कचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना घ्यावयाची काळजी, यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच, कोरोनाविषयी ढिलाई न करण्याबद्दलही त्यांनी बजावले.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा राज्याला कसा फायदा होतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माहिती दिली. या वेळी, त्यांनी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचे विशेष आभार मानले. तसेच, त्यांना 'लढवय्ये कोरोना योद्धे' म्हणून गौरवले.
'प्रत्येक घरात जाऊन हे सर्वजण चौकशी करत आहेत. गेल्या आठवड्यात माझ्याही घरी येऊन ते चौकशी करून गेले. अगदी लांबून ते येतात. उंच इमारतींमध्ये जिने चढ-उतार करत आहेत,' असे मुख्यमंत्र्यांनी म्हणत कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच, त्यांच्यामुळे घरोघरी असलेल्या आजारी व्यक्ती, कोरोनाबाधित यांची माहिती मिळाल्याने त्यांच्यावर वेळच्या वेळी उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले, असे ते म्हणाले. काही कोरोना योद्ध्यांची नावे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, 'अशी कितीतरी नावे आहेत. हे आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स घरोघरी गेले नसते तर, काही रुग्णांवर वेळीच उपचार करणे आणि त्यांचे जीव वाचवणे शक्य झाले नसते. या योद्ध्यांपैकी काहीजण तर, स्वतः हे काम करताना आजारी पडले. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी व्यवस्थित उपचार घेतले आणि खणखणीत बरे झाले. त्यानंतर घरी न बसता पुन्हा कामावर रुजू झाले. असे योद्धे आपल्या महाराष्ट्रात आहेत,' असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.