मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाचे 215 रुग्ण असून त्यापैकी मुंबई परिसरात 123 रुग्ण आहेत. त्यापैकी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईसाठी 'कोरोना वॉर रुम'ची स्थापना केली आहे. यात मुंबई मेट्रो प्रकल्पातून उचलबांगडी केलेल्या अश्विनी भिडे यांच्यासह रामस्वामी एन. यांची नियुक्ती केली आहे. तसेच भिडे यांना पालिकेच्या 'कोरोना वॉर रूम'च्या प्रमुख समन्वयक बनवण्यात आले आहे.
हेही वाचा... कोरोना लढा : पोलीस असलेले वडील कर्तव्यावर; हैदराबादमधून मुलाने लिहिले भावनिक पत्र
मुंबई महापालिका क्षेत्रातील कोव्हिड-१९ च्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील दोन अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिनियुक्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेत पाठवले आहे. यामध्ये १९९५ च्या तुकडीतील अश्विनी भिडे आणि २००४ च्या तुकडीतील डॉक्टर रामस्वामी एन. या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे दोन्ही अधिकारी आज पालिका आयुक्तांनी कोरोना संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीला उपस्थित होते.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये 'कोरोना वाॅर रुम' सुरू करण्यात आली आहे. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर नुकत्याच रुजू झालेल्या अश्विनी भिडे या 'वाॅर रुम'च्या प्रमुख समन्वयक आहेत. या 'वाॅर रुम'च्या माध्यमातून आवश्यक ती नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक व व्यवस्थापकीय कारवाई दिवसाचे चोवीस तास व आठवड्याचे सातही दिवस सातत्याने करण्यात येणार आहे, असे पालिकेने सांगितले आहे.