मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपाने राज्य सरकारला आव्हान दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. सरकार पडणार असा सतत इशारा भाजपाकडून दिला जातो. त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी सरकार पाडून दाखवावं. माझे 170 मोहरे आहेत. ते मला सोडून तुमची गुलामगिरी करणार नाहीत. हिंमत असेल तर ते फोडून दाखवाच, असे प्रतिआव्हान दिले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनमुळे आता वादळी ठरण्याची शक्यता आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनामा, एसटीचा संप, ओबीसी - मराठा आरक्षण आदी विविध मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची व्यूहरचना आखली. राज्य सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला. यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामटेक बंगल्यावर उपस्थित होते. भाजप म्हणजे एक सापाची जमात असल्याचा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री ठाकरे यांनी चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित होते.
दाऊदच्या मुसक्या का आवळत नाहीत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावरील आरोपांवरुन भाजपाने अधिवेशन काळात सरकारला घेरण्याची तयारी केली. मुख्यमंत्री ठाकरे यावरून भाजपाला लक्ष्य केले. सध्या देशात एक विकृती आहे. एक घृणास्पद राजकारण सुरु आहे. विकृतीपेक्षा घाणेरडेपणा पाहायला मिळतेय. हिम्मत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाहीत. तिकडे पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही? असा खरमखरीत प्रश्न भाजपाला विचारला आहे.
माझे मोहरे फोडून दाखवाच
आज इकडे धाड पडत आहेत, तिकडे धाड पडत आहेत, याला अटक करत आहेत, त्याला अटक करत आहेत. मात्र, आता हे खपवून घेतले जाणार नाही. आपली एकजूटच आपली ताकद आहे. आम्ही कुणावर वार करत नाही, पण कुणी वार केला तर आम्ही सोडणार नाही’, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी भाजपला दिला आहे. त्याचबरोबर सरकार पाडणार, सरकार पाडणार म्हणतात. माझे 170 मोहरे फोडून दाखवाच. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्करणार नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजला थेट आव्हान दिल आहे.