मुंबई - मराठा आरक्षण निकालाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांयकाळी ८:३० वाजता राज्यातील जनतेशी समाज माध्यमांद्वारे संवाद साधणार आहेत. निकालानंतर राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीवरही मुख्यमंत्री भाष्य करतील.
मराठा समाजाची राज्य सरकारवर टीकेची झोड!
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. मराठा आरक्षण रद्द करताना गायकवाड आयोगाच्या शिफारसी नाकारल्या. मराठा समाजाने यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने सरकारच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. महाविकास आघाडीने त्याला प्रत्युत्तर दिले. दिवसभर आरोप-प्रत्यारोपाच्या सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र सरकार मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून देईल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याचे महाविकास आघाडी सरकारच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दिलेला लढ्याची माहिती देतील, शिवाय, मराठा आरक्षणासाठी नेमकी काय नवीन धोरण आखावी लागतील, याबाबत भाष्य करण्याची शक्यता आहे.