मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी मुंबईतून गुजराती, राजस्थानी बाजूला केले तर मुंबईत पैसा उरणार नाही, असे विधान एका कार्यक्रमात केले आहे. त्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया राजकीय पक्षांकडून येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरही या विषयावर पत्रकारांशी बोलले आहेत. केसरकर म्हणाले, एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर त्यांच्याविषयी चांगले बोलण्याऐवजी त्यांनी पैसा काढून घेतल्यास मुंबईत काही शिल्लक राहणार नाही, हे राज्यपालांचे विधान योग्य नाही. कदाचित राज्यपालांना मुंबईचा फारसा अभ्यास नाही. देशाला 40 टक्के कर देणाऱ्या मुंबईच्या विकासात सर्वांचाच हातभार लागला आहे. मुंबईनेच सर्वांना आश्रय दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात केंद्राला पत्र लिहिणार ( CM Shinde will write letter to centre ) आहेत, असेही केसरकर यांनी सांगितले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील जनतेच्या भावना जपायला हव्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावरून परतल्यानंतर सगळे आमदार त्यांना भेटतील. मराठी माणसांच्या भावना तीव्र आहेत. मुख्यमंत्री केंद्राला याबाबत पत्र लिहून ( CM Shinde will write letter to centre ) कळवतील. मुख्यमंत्री मराठी माणसांच्या भावना केंद्राला कळवतील. राज्यकर्त्यांनी जी भूमिका घ्यायची असते ती आम्ही घेऊ असेही दीपक केसरकर यांनी म्हटलं. दरम्यान, राज्यपाल पदावर असतात तेव्हा वादग्रस्त विधान करणे टाळले पाहिजे. राज्यपालांच्या अशा विधानानंतर राज्यातील भावना केंद्र सरकारला कळवायला हव्यात. कदाचित राज्यपालांच्या या विधानानंतर केंद्राला पत्र लिहून भावना व्यक्त करणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री असतील असंही केसरकरांनी सांगितले आहे.
काय म्हणाले राज्यपाल? - ठाणे, मुंबई या शहरातून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जाते ते देखील म्हणता येणार नाही असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यपालांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी माफी मागावी असे म्हटले आहे.