मुंबई - नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण वादाच्या बैठकीत मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या नावावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. रविवारी (आज) बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याबाबत ठाम भूमिका घेतली. इतर प्रकल्पाला दि.बा. पाटील यांचे नाव सुचविण्याचे पुर्नरूच्चार मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्यावर कृती समितीच्या शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त करीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा ऐवजी दुसरे कोणतेच पर्याय मान्य नसल्याची भूमिका घेतली आहे.
२४ तारखेला सिडकोला घेराव घालण्या शक्यता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे. याबाबत लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून येत्या २४ तारखेला सिडकोला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी कृती समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या नावावर ठाम राहिल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रकल्पग्रस्त नेत्यांमध्ये फूट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाची यापूर्वीही बैठक झाली होती. यावेळीही मुख्यमंत्र्यांनी विमानतळा ऐवजी इतर प्रकल्पाला दिबांचे नाव सुचविण्याची सूचना केली होती. या बैठकीत प्रकल्पग्रस्त नेत्यांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीचे स्थानिक नेत्यांनी विमानतळाऐवजी इतर प्रकल्पाला दिबांचे नाव देण्याबाबत तयारी दर्शविली होती. तर भाजपासह इतर प्रकल्पग्रस्त नेते दिबांच्या नावावर ठाम होते. याबाबत विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांचा अवधी देऊन पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते.
बैठकीला हे होते उपस्थित
या बैठकीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे एमडी संजय मुखर्जी, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, संतोष केणे, राजेश गायकर आदींसह प्रकल्पग्रस्त नेते उपस्थित होते.
हेही वाचा -प्रताप सरनाईकांच्या पत्रातील आरोप गंभीर; सर्वांनी त्याचा अभ्यास करावा - संजय राऊत