मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखे दिसणारे विजय माने त्यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा याकरिता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच त्यांनी याचिकेत असे म्हटले आहे की कुठलेही ठोस पुरावे न देता त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांना पोलिसांनी सांगितले होते की जर तुम्हाला कुठल्याही कारवाईपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखे न दिसण्यासाठी तुमची दाढी आणि राहणीमानामध्ये बदल करा. या विरोधात देखील याचिकेत पोलिसांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात विजय माने यांना मानसिक त्रास झाला. त्यासाठी आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांना एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या प्रकरणातील वकील असीम सरोदे यांनी याचिकेद्वारे केली आहे.
गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल केल्याने कारवाई - दुसरीकडे पुण्यात फिर्यादी पोलीस हे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी माहिती मिळाली की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोषाख परिधान करणारा विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून तो सोशल मीडियामध्ये व्हायरल केला आहे. खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने व्हॉट्सअप व फेसबुक या सोशल मीडियाद्वारे माहिती घेतली असता पोलिसांना एक फोटो मिळाला.
गैरसमज पसरवल्याचे कारण - फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचे दिसत आहे. आरोपी विजय माने हा नियमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभुषा व पोशाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा अशा पद्धतीने वावरत होता. विजय माने याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समाजातील प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरवल्याचे कारण फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.