मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दरबारी जाणार ( CM Eknath Shinde Visit Delhi ) आहेत. उद्या ( शुक्रवार ) सायंकाळी ते दिल्लीला जाणारा आहे. शनिवारी ( 9 जुलै ) ते दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ), गृहमंत्री अमित शहा ( HM Amit Shah ), भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची ते भेट घेणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत.
मंत्रिमंडळाबाबत चर्चा होण्याची शक्यता - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष करून ११ जुलैला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयाचे सुनावणी आहे. त्यानंतर महाराष्ट्रात शिंदे - फडणवीस नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा सुद्धा या भेटीत होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिंदे गटाला १५ तर भाजपला १८ मंत्रिपद दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
दिल्लीहून-पुणे-पंढरपूर - १८ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी राष्ट्रपती पदासाठी भाजपकडून असलेल्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रात करण्यात येणाऱ्या मतदानाबाबत देखील चर्चा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील नैसर्गिक आपत्तीत केंद्राकडून कशा पद्धतीने मदत करता येईल, याबाबत सुद्धा दिल्लीवारीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सायंकाळी दिल्लीहून पुण्याला जाणार आहेत. त्यानंतर ते पुण्याहून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला रवाना होणार आहेत.
बंडावेळी भाजपच्या नेत्यांची फिल्डींग - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बंड केले होते. त्यासाठी भाजपने दिल्लीतून फिल्डींग लावलेली. अमित शहा, जे.पी.नड्डा हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. दिल्लीत बसून गुजरात आणि गुवाहाटीतमधील सूत्र फिरत होते. आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामागे भाजपने पावलोपावली त्यांना मदत केली. म्हणून महाराष्ट्रात शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाले.