मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्या. काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Union Home Minister Amit Shah ) यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
या मुद्द्यांवर झाली चर्चा : दोन्ही नेत्यांच्या या भेटीदरम्यान सध्या महाराष्ट्रातील असली राजकीय परिस्थिती, एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांचा सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढा आणि राज्यातील महत्त्वाची विकास कामे या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचे सांगितले आहे. या भेटी दरम्यान वेदांता ग्रुप आणि फॉक्स काँन समूहाचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याच्या मुद्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
शिवसेनेला मिळेल का परवानगी ? : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये सध्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासंदर्भात वाद सुरू आहे. याबाबतची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात आज होणार असून शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी याव याबाबतच्या देखील हालचाली सुरू आहेत. दसरा मेळाव्याला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यावे. याबाबत देखील रात्री झालेल्या अमित शहा यांच्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.