मुंबई - राज्यात वातावरणामध्ये बदल झाला आहे. कमी दाबाचे पट्टे आणि हवेत चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या सर्वच भागात आठवडाभर पावसाळी वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, मुंबईतील तापमान वाढ होणार असल्याने मुंबईकरांना चटके सहन करावे लागणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
पुढील आठवडाभर राहणार ही परिस्थिती -
काही दिवसात तापमानातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे नागरिकांना उकड्याचा सामना करावा लागत आहे. दोन दिवस मुंबई भागात आणखीन तापमान वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिणपासून मध्य प्रदेश या भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. यामुळे हवेचे चक्रे स्थितीत बदल झाला आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत राज्याला अवकाळी पावसाचा सामना करावा लागला होता. काही ठिकाणी गारपिटीमुळे मोठे नुकसानदेखील झाले होते. तसेच अशीच परिस्थिती पुढील आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोकणात पावसाची शक्यता -
कोकण आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 9 मेपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातदेखील पुढील तीन दिवस तुरळक सरी आणि विजेचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मुंबईकरांना सहन करावा लागणार उकाडा -
मुंबईने आजूबाजूच्या भागांमध्ये आत्तापासूनच वैशाख वणव्याचे चटके बसू लागले आहेत. काही दिवसात मुंबईतील तापमान छत्तीस अंशाच्या पुढे जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील दिवसात मुंबईकरांना आणखी उकाडा सहन करावा लागणार आहे.