मुंबई - चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांना 100 कोटी वसुली प्रकरणात क्लीनचिट ( Clean Chit To Anil Deshmukh ) दिली आहे. चांदीवाल आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. चांदीवाल आयोगाच्या अहवालात नमूद, गृहमंत्र्यांनी चांदीवाल आयोगाचा 201 पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला आहे. अहवालात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.
परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 20 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीचा अहवाल नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. 201 पानी अहवालात परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे नमूद केले आहे. या अहवालाच्या आधारावर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय होते पत्रात - मुंबईत 1750 बार आहेत. प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपयांची वसुली दर महिन्याला केल्यास 40 ते 50 कोटी रुपयांचा टार्गेट पूर्ण होईल. उरलेले 50 कोटींच्या टार्गेटसाठी इतर माध्यमातून प्रयत्न करावा लागेल, असे सांगून दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. तसेच दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात सुसाईड नोटच्या आधारावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा मुंबई पोलिसांकडे नोंदवावा, यासाठी देशमुख यांचा माझ्यावर दबाव असल्याचे परमबीर सिंग यांनी पत्रात म्हटले होते.
हेही वाचा - Mumbai Police Rana Video : राणा दाम्पत्याला पोलिसांनी चहापाणी दिले; मुंबई पोलीस आयुक्तांकडून व्हिडिओ शेअर