मुंबई - मुंबई महापालिकेत निवडून गेलेल्या नगरसेवकांना विभागात काम करण्यासाठी निधी दिला जातो. तसेच स्थायी समितीकडून राजकीय पक्षांनाही निधीचे वाटप केले जाते. सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेने आपल्याला जास्त निधी घेतल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. या आरोपाचे खंडन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केले आहे. आरोप करणारे भाजपा नगरसेवक मिश्रा हे भाजपाचे विकृत नेते असल्याचा टोला जाधव यांनी लगावला.
आरोपाचे खंडन; भाजपचे मिश्रा हे विकृत नेते-
नगरसेवक निधी म्हणून प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाला एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येतो. तसेच पक्ष निधी म्हणून स्थायी समितीकडून वेगळा निधी देण्यात येतो. मिळणाऱ्या निधीच्या माध्यमातून नगरसेवकाने आपल्या प्रभागात कशा प्रकारे कामे करुन घ्यावी, हे त्या नगरसेवकाचे कौशल्य असते. भायखळा येथील माझ्या प्रभागात निधी खर्च करत आहे. खर्च करण्यात येणारा निधी गरजू, महिला बचतगटांना वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपला हा प्रकार झोंबण्याची गरज काय, असा सवाल करत भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केलेल्या आरोपांचे यशवंत जाधव यांनी खंडन केले आहे. तसेच त्यांनी मिश्रा हे भाजपाचे विकृत नेते असल्याचा टोला लगावला आहे.
नीधीचे वाटप -
मुंबई महापालिकेत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष आहे. पालिकेत भाजप, काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्ष या पक्षांचे नगरसेवक आहेत. दरवर्षी अर्थसंकल्पात नगरसेवक निधी किती द्यावा, याची तरतूद आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात येते. तर स्थायी समितीचे विशेष अधिकार असून स्थायी समिती २२७ नगरसेवकांना निधी उपलब्ध करुन देते. तसेच स्थायी समितीच्या माध्यमातून प्रत्येक पक्षालाही निधी दिला जातो. नगरसेवक व पक्षाला देण्यात येणाऱ्या निधीच्या माध्यमातून नगरसेवक आपल्या प्रभागात कामे करतात. भायखळा येथील माझ्या प्रभागात मी नगरसेवक निधीतून काम करत आहे. तो निधी मी घरी घेऊन जात नाही. तसेच कुठल्या पक्षाला किती निधी देणे हा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून माझा अधिकार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
मिश्रा हे आरटीआय कार्यकर्ते!
विनोद मिश्रा यांनी माझ्या प्रभागात काय चालले आहे, यापेक्षा स्वत:च्या प्रभागात लक्ष दिले तर तेथील प्रश्न सुटतील, असा टोला जाधव यांनी लगावला आहे. मिश्रा हे नगरसेवक कमी असून आरटीआय कार्यकर्ते अधिक असल्याची टीका जाधव यांनी यावेळी केली.