मुंबई - मुंबईत पावसाळ्यात घरे, इमारती, दरडी कोसळतात. या दुर्घटना घडल्यावर वेळेवर मदत न मिळाल्याने नागरिकांचे मृत्यू होतात. हे मृत्यू रोखण्यासाठी व दुर्घटनास्थळी त्वरित मदत मिळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन व्यवस्थापन विभागाकडून दरडी कोसळू शकतात, अशा विभागातील स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. असे प्रशिक्षण दिल्याने दुर्घटनास्थळी बचाव पथक पोहोचण्याआधीच मदत कार्य सुरु करणे शक्य होणार असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली ( Citizens help when houses buildings collapse in mumbai ) आहे.
दरडी कोसळणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना प्रशिक्षण - मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईत दरडी कोसळू शकतात अशा ७२ ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. या ठिकाणी दुर्घटना घडल्यावर त्याठिकाणी बचाव पथक पोहचण्यास काही कालावधी लागतो. दुर्घटना घडल्यापासून बचाव पथक पोहोचण्याच्या काळात नागरिकांची पळापळ असते. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना प्रथोमोपचार देणे असे प्रशिक्षण दिल्यास नागरिकांचे मृत्यू रोखता येऊ शकतात, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली.
१० हजार नागरिकांना प्रशिक्षण - दरड कोसळू शकते अशा ठिकाणी नागरिकांना अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि डॉक्टरांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण दिल्याने दरड कोसळल्यास त्याठिकाणी राहणारे नागरिक, अंथरुणाला खिळून असलेले नागरिक अशा लोकांना त्वरित मदत पोहचवून त्यांचा जीव वाचवणे शक्य होणार आहे. अनिरुद्ध अकॅडमीची यासाठी पालिकेला मदत मिळत आहे. दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी १० हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ८ प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची नार्वेकर यांनी दिली.
एनडीआरएफच्या ३ टीम - मुंबईमध्ये दरडी कोसळून नागरिकांचा मृत्यू होतो. हे मृत्यू रोखण्यासाठी दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी एनडीआरएफच्या ३ टीम तैनात करण्यात येणार आहेत. या टीम मधील कर्मचारी दरड कोसळू शकतात अशा ठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत राहून दुर्घटना घडल्यास बचाव करतील, असे नार्वेकर यांनी सांगितले.
बचाव यंत्रणेकडून रेकी - मुंबईत दरडप्रवण क्षेत्रात एकुण ७२ ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा ठिकाणी तसेच पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पालिका, अग्निशमन दल, पोलीस, नेव्ही, एनडीआरएफ आदी यंत्रणांनी रेकी केली आहे. यामुळे दुर्घटना घडल्यास त्याठिकाणी मदत आणि बचाव काम करणे सोपे जाणार असल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली.
६ वर्षात ११६६ जणांचा मृत्यू - आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. त्यात ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३०६६ जण जखमी झाले आहेत. १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३१५० दुर्घटना घडल्या. त्यामध्ये १७९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात १३२ पुरुष आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे. तर ७२२ जण जखमी झाले. २०१३ ते २०१९ या ६ वर्षाच्या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये ११६६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - Girlfriend Murder In Sangli : प्रेयसीने बर्थडे गिफ्ट म्हणून मागितली सोन्याची अंगठी, प्रियकराने काढला काटा