मुंबई - शंभर कोटी कथित वसुली प्रकरणी परमबीर सिंह यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर परमबीर सिंह मे महिन्यापासून कोणाच्याही संपर्कात नाहीत. ते कुठे आहे हे कुणालाही माहीत नाही. अनेक नोटीस पाठवून सुद्धा परमबीर सिंह चौकशीला आले नाहीत. परमबीर सिंह यांच्याविरोधात सीआयडीने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे रेड कॉर्नर नोटीस काढण्याची पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
रेड कॉर्नर नोटीस काढण्याच्या तयारीत राज्य सीआयडी! -
खंडणीचे आरोप असणारे मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याची तयारी राज्य सीआयडी करत आहे. सीआरपीसीच्या कलम 82 आणि 83 नुसार परमबीर सिंहांना फरार घोषित करण्यात येईल. तसंच परमबीर सिंहाच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची सीआयडीने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केल्याचीही माहीती मिळतेय.
...तर देश सोडून जाणे मुश्किल -
परमबीर सिंह नेमके कुठे आहेत हे अद्याप कुणालाच माहिती नाही. त्यामुळे ते देश सोडून जाऊ नयेत यासाठी पोलिसांच्या वतीने रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकदा का त्यांच्या विरोधात रेड कॉर्नल नोटिस जारी केली तर त्यांना देश सोडून जाणे कठीण होईल. तसे निर्देश देशातील सर्व विमानतळांना देण्यात येतात.
आठ महिन्यापासून बेपत्ता -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटीच्या खंडणी प्रकरणाशी परमबीर सिंह यांचे प्रकरण जोडलेले आहे. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारने नेमलेला चांदिवाला आयोग करतोय. आयोगाने परमबीर सिंह यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले पण परमबिर सिंह एकदाही चौकशीला आले नाहीत. त्यांच्यावर मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणीची गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी नुकतेच नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आहे. ते दोघेही पोलीस कोठडीत आहेत. मे महिन्यापासून परमबीर सिंह कुठे आहेत हे पोलिसांनाही माहीत नाही.
अँटिलिया प्रकरणात गेले होते पद -
अँटिलियाच्या परिसरात स्फोटके सापडल्याच्या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर परमबीर सिंह यांच्या विरोधात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या आयुक्तपदावरुन हटवण्यात आले होते.
अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब -
आयुक्तपद गेल्यानंतर परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र लिहिले होते. त्यात सचिन वाझेला अनिल देशमुख यांनीच हॉटेल्स आणि बारमधून 100 कोटी रुपये घ्यायला सांगितल्याचा उल्लेख होता.
परमबीर सिंहांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरुद्ध ठाणे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. बिपिन अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे आणि अँटिलिया स्फोटके प्रकरणी अटक करण्यात आलेला छोटा शकीलचा गुंड रियाझ भाटी हेही आरोपी आहेत. अग्रवाल यांच्या मते वाझे आणि इतर आरोपी मिळून मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळायचे आणि पैसे न दिल्यास त्यांच्यावर कारवाईची भीती दाखवली जात होती.
हेही वाचा - परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, खंडणी प्रकरणी आणखी दोन पोलीस अधिकारी अटकेत