मुंबई - कोरोनाच्या काळात महिलांच्या वाढत्या अत्याचाराविषयी मी भाष्य केले आहे. कोरोनाशी लढताना महिलांचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोरोनावर मात करत असताना महिलांसोबत क्वारंटाइन सेंटरमध्ये अत्याचार होत आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. मुख्यमंत्री, आम्हाला तुमची भाषणं नकोत, कृती दाखवा. शिवरायांचा महाराष्ट्र कुठे आहे? असा सवाल आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला.
आज मुंबई प्रदेश कार्यालयात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, पनवेल, चंद्रपूर, कोल्हापूर, पुणे येथे कोरोना सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. बलात्कार, विनयभंग होत आहेत, हे सरकारचं अपयश आहे. याचं उत्तर सरकारला द्यावे लागेल. महिलांना कोरोना झाला तर त्यांनी उपचार घ्यावे की घरात मरावं. मी अनेक मागण्या या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्या आहेत. ते मुख्यमंत्री यांच्याकडे देणार असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.
कोरोना सेंटरमध्ये महिला आणि पुरुषांना एकत्र ठेवणे चुकीचे आहे. जागा आहे तर महिलांना वेगळं ठेवा. एकटी महिला असेल तर त्यांना पुरुषांसोबत का ठेवता? सीसीटीव्ही काही ठिकाणी नाहीत ते लवकर लावावे. तसेच महिलांच्या येथे पॅनिक बटन असेल तर तिला घटनेवेळी मदत मिळेल. नातेवाईकांना रुग्णांना भेटण्यास मज्जाव करावा. गरज असेल तरच सर्व नोंदणी करून भेटण्यास परवानगी देणे गरजेचे असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
पनवेल येथे घडलेल्या प्रकाराची व त्या व्यक्तीची कुठेही प्रवेशद्वारावर नोंद नाही. आरोपी हाच गुन्हेगार कसा? सुरक्षारक्षक असतील किंवा हॉस्पिटलमधील कर्मचारी असतील त्यांची काही जबाबदारी नाही का? असा सवाल देखील वाघ यांनी उपस्थित केला. पुण्यात पीपीई किट नसल्यामुळे पोलीस महिला ड्युटीच्या ठिकाणी हजर झाली नाही. पोलिसांना दोष नाही देत, पण गृहमंत्री यांनी हे पुरवलं पाहिजे. स्वॅब टेस्टिंगची जनजागृती सरकारकडून होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात होणे गरजेचे असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
अमरावती प्रकरणातील आरोपी जिथे काम करायचा तिथे त्याचे वर्तन ठीक नव्हते. नर्स यांच्यात कुजबुज होती की हा माणूस चांगला नाही. तरीही काहीही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री आम्हाला तुमची भाषणं नकोत कृती दाखवा. शिवरायांचा महाराष्ट्र कुठे आहे? दिशा कायद्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. किती महिलांवर बलात्कार झाल्यावर दिशा कायदा आणणार आहात? इतर प्रशासकीय काम चालू होत आहेत. पण या कायद्याला उशीर का? आम्ही दिशा कायद्याची वाट पाहत आहोत. कायदे आहेत ते चांगलेच आहेत. पण नवीन कायदे येऊन सक्षम असेल तर त्यांचे स्वागत आहे, असे वाघ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.