मुंबई - राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर भोंग्यांना विरोध केल्यानंतर सर्वाधिक चर्चा झालेल्या वसंत मोरे यांची मनसे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर मोरे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट मनसेचे वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली ( CM offer directly to Vasant More ) आहे. मोरे आता काय भूमिका घेणार, हे पाहावे लागणार आहे.
मोरेंना पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच - दादर शिवाजी पार्क येथील दसरा मेळावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा समोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा दिला. मुस्लिम समाजबांधवांसह मनसेमध्ये याबाबत नाराजीचे वातावरण आहे. पुणे शहराचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात मत व्यक्त केले. कोणताही मशिदीसमोर स्पीकर लावणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तात्काळ मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली. पदावरून हटवले असले तरी, मनसेतच राहणार अशी भूमिका मोरे यांनी मांडली. मात्र जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून मोरे यांना पक्षात येण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
वरुण सरदेसाई यांचा मोरेंना फोन - राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मोर यांना ऑफर दिल्यानंतर आता शिवसेनेनेही थेट ऑफर दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटण्यास बोलावले आहे. वरुण सरदेसाई, आदित्य शिरोडकर यांनी फोनवर संपर्क साधला आहे. मोरे यांनी ऑफर आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.