मुंबई : अमित शाह म्हणाले हिम्मत असेल तर एकट्याने लढा. अरे आम्ही मर्द आहोत. एकट्याने लढायची आमची तयारी आहे. फक्त एकट्याने लढा म्हणायचं आणि ईडीची पीडा मागे लावायची, असं कशाला करता. याला शौर्य म्हणत नाही. तुमच्या ताब्यातील अधिकार तुम्ही वापरू नका. आम्ही आमच्या ताब्यातील अधिकार वापरत नाही. मग पाहू कोणामध्ये किती हिम्मत आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना आव्हान दिले.
हे हिंदुत्वाचं कातडं पांघरलेले हिंदुत्ववादी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाव न घेता भाजप, अमित शाह आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव अथवा शेळी असते त्याप्रमाणे हे (भाजप ) हिंदुत्वाचं कातडं पांघरलेले हिंदुत्ववादी आहेत. शिवसेनेनं कधी हिंदुत्व सोडलेलं नाही. सोडणारही नाही. आम्ही भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं असं नाही. तेही दिवस आठवा ज्यावेळी यांचं ( भाजप ) डिपॉझिट जप्त होत होत. त्यावेळी यांनी सगळ्यांशी युती केली. हे ( भाजप ) नवहिंदुत्ववादी हिंदुत्वाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत. सत्ता पाहिजे म्हणून यांनी मेहबुबा मुफ्तीशी, संघावर टीका करणाऱ्या नितीश कुमार यांच्याशी युती केली. यावरून हे सिद्ध होत, असाही टोला त्यांनी लगावला. हिंदुत्व म्हणून काही राज्यात गोवंश हत्या बंदी करण्यात आली. काही राज्यात नाही केली, हे तर तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही. करायची असेल तर संपूर्ण देशभर गोवंश हत्याबंदी लागू करा. आम्ही लोकशाहीचा अपमान केला म्हणता, आम्ही जे केलं ते सूर्य उगवल्यानंतर केलं. चोरून मारून शपथ घेतली नाही. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांचा संसार मोडून तुम्ही सत्ता स्थापन केली. याला लोकशाही म्हणायचं का मग? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
काळजीवाहू विरोधकांना भगव्याचा तेज दाखवणार
गेल्या वर्षी आपण फेब्रुवारीत शिवसंपर्क मोहीम राबवायचा ठरवलं आणि दुसरी लाट आली. दिवाळीनंतर राज्यात फिरायचं ठरवलं तर माझं मानेचं दुखणं उद्भवल. लाटांमागून लाटा येताहेत तर शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही. दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न शिवसेना प्रमुखांनी दाखवलं. ते आपण पूर्ण करू शकलो नाही तर सगळं निरर्थक आहे. एक दोन महिने शस्त्रक्रियेनंतर उपचारात गेले. पण लवकरात लवकर मी बाहेर पडून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. काळजीवाहू विरोधकांना भगव्याचा तेज दाखवणार. काळजीवाहू विरोधक हे एकेकाळी आपले मित्र होते. त्यांना आपण पोसले. २५ वर्षे युतीत आपली सडली. राजकारण म्हणून आज काहीही खाजवत आहेत. हे राजकारणातले गजकर्णी आहेत, असं म्हणत ठाकरे यांनी त्यांच्या आजारपणावरून टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार टोला लगावला.
..तर शिवसेनेचा पंतप्रधान असता
बाबरी पाडल्यावर 'गर्व से काहो हम हिंदू है', 'बाबरी आमच्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे', असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यावेळी शिवसेनेची देशात इतकी मोठी लाट होती की, त्यावेळी शिवसेनेनं सीमोल्लंघन केलं असतं तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता, असंही ठाकरे म्हणाले. शिवसेनेने भाजपचा वापर केला असं म्हणता तर मग मोदींचा, अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरायला मला का बोलावलं. म्हणजे तुम्ही शिवसेनेचा वापर करून घेतला, असं मी म्हणू शकतो. हिंदुत्वासाठी त्यावेळी आम्हाला सत्ता पाहिजे होती. सत्तेसाठी हिंदुत्व नव्हतं पाहिजे, असंही ते म्हणाले.