मुंबई - ओमायक्रॉन विषाणूचा ( Omicron Variant ) संसर्ग वेगाने पसरतो आहे. राज्य सरकारने त्याला रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून राज्यातील लसीकरण वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी बुधवारी (दि. 8) मंत्रिमंडळ बैठकीत दिले.
महाराष्ट्रात काळजी घ्या
मागील बारा तासात संपूर्ण जगात ओमायक्रॉनच्या रुग्णात 45 टक्के वाढ झाली आहे. 54 देशात त्याचा संसर्ग पसरला आहे. फ्रान्समध्ये दररोज रुग्ण 40 हजारांच्या पुढे आढळत असून जर्मनीत ही संख्या 50 हजारांच्या आसपास आहे. ऑस्ट्रीयामध्येही कोविड सुरू झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली आहे. दररोज 7 हजारांच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेतही नोव्हेंबर, 2020 सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत मागील 2 आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली आहे. दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 10 रुग्ण आढळले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेले पाहिजे, यावर भर द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
12 कोटी 3 लाख डोस घेतले
महाराष्ट्राने सध्या 12 कोटी 3 लाख 18 हजार 240 डोसेस दिले आहेत. 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे. 18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85.25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे.
हे ही वाचा - Maharashtra Omicron Variant : दिलासादायक...आज राज्यात ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही !