मुंबई - देशात सर्वत्रच उत्तर भारतीयांनी छठपूजा मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली. मुंबईतही छठपूजेसाठी दरवर्षी उत्तर भारतीय मोठ्या संख्येने जुहू बीचवर येत असतात. भाजप व काँग्रेस राजकीय पक्षांसह मुंबईतील उत्तर भारतीय लोकांकडून जुहू येथे आज मावळत्या सूर्याची पूजा करत 4 दिवस सुरू असलेल्या छठपूजा कार्यक्रमाचा समारोप झाला.
पूजेनिमित्त आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमाचा आस्वाद उत्तर भारतीय लोकांनी घेतला. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जुहू येथे भाजप व काँग्रेस शिवसेना या राजकीय पक्षांकडून तर्फे मोठ्या जोशात छठपूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता. छठपूजेनिमित्त संगीत कार्यक्रमाचा आनंद घेत उल्हासपूर्ण वातावरणात पूजा करण्यात आली.
हेही वाचा - कोणी घर देता का रे घर..?, धुळ्याच्या 'नटसम्राटाची' आपल्या पाल्यांकडून अवहेलना
छठ म्हणजे काय?
छठ हे लोकांच्या श्रद्धेचं पर्व आहे. या पूजेच्या आयोजनासाठी कोणतेही ऐतिहासिक प्रमाण नाही. महाभारताच्या काळात द्रौपदीने निर्जळी उपवास करून पाचही पांडवांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती आणि त्यासाठी तिने षष्ठीला सूर्याची आराधना केली होती, अशी आख्यायिका आहे. तीच परंपरा अजूनही सुरू आहे, असे सांगितले जाते.
छठपूजेत व्रत करणारे लोक 36 तास निर्जळी उपवास करून सूर्याला अर्घ्य देतात. असे सांगितले जाते की सूर्य आणि व्रत करणारी व्यक्ती एकमेकांसमोर असतात त्यामुळे त्यांना कोणत्याच मध्यस्थाची गरज भासत नाही म्हणून या पूजेत कोणी भटजी नसतो आणि कोणताही मंत्र नसतो.
ही पूजा मुख्यत: बिहारमध्ये केली जाते. नंतर ती झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील लोकांतर्फे केली जाऊ लागली. आता इतर समुदायातील लोकसुद्धा हा सण साजरा करतात. छठ पूजेचा उद्देश उत्तम आरोग्य, आप्तस्वकीयांचं दीर्घायुष्य आणि कुटुंबाची समृद्धी हा असतो.
हेही वाचा - प्रेमविवाह केलेल्या मुलीला कुटुंबीयांची 'भावपूर्ण श्रद्धांजली'; रायगडमध्ये रंगले नाट्य