मुंबई - मुंबईमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे, उत्तर भारतीय समाजबांधवाचा महत्त्वाचा सण असलेली छटपूजा समुद्र किनाऱ्यांवर साजरी करण्यास महापालिकेकडून परवानगी देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर आता घरासमोरच कृत्रिम तलाव बांधून छटपूजेस सुरुवात करण्यात आली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील अशाचप्रकारे घरी छटपूजा केली व इतरांनी देखील साधेपणाने छटपूजा करावी, असे आवाहन केले.
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महापालिकेने यंदा सर्वच धार्मिक सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार यावर्षी सर्व सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. आजपासून दोन दिवस छटपूजेचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. परंतु यावेळी ही पूजा सार्वजनिकरित्या समुद्रकिनाऱ्यावर न करता घरासमोर कृत्रिम तलावांची निर्मिती करून साजरी करण्यात येत आहे. बोरीवलीमध्ये उत्तर भारतीय बांधवांनी आपल्या घरापुढे कृत्रिम तलावाची निर्मिती करून पूजा केल्याचे पहायला मिळाले. दरम्यान छटपूजा करणाऱ्या सर्व नागरिकांनी आपल्या घरातच पूजा करावी. कोणीही जुहू चौपाटीवर पूजेसाठी जाऊ नये, असे आवाहन संजय निरूपम यांनी केले आहे.