मुंबई - आरोग्य विभागाची भरती परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने मोठा गदारोळ झाला. अखेर आरोग्य विभागाकडून गट ‘क’ साठी २४ तर गट ‘ड’ साठी ३१ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली. मात्र, त्याच दिवशी राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून टीईटी परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. आता परीक्षेचं आयोजन 30 ऑक्टोबरला होणार आहे.
- टीईटी परीक्षा लांबणीवर-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेची तारीख आता बदलण्यात आली आहे. आता ही परीक्षा 30 ऑक्टोबरला होणार आहे. आरोग्य विभागाची गट ‘क’ साठी २४ तर गट ‘ड’ ही परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार असल्याने टीईटीच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना परीक्षेच्या तारखा बदलण्याबाबब चर्चा केल्याचे सांगितले होते. यापूर्वी परीक्षेचे आयोजन 10 ऑक्टोबरला करण्यात येणार होते. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्याने राज्य सरकारच्या परवानगीने टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिक्षण विभागाच्या बैठकीत टीईटी परीक्षा लांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे.
- ३ लाख ५ हजार ८५० अर्ज-
इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विनाअनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यामध्ये 30 ऑक्टोबरला टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत टीईटी परीक्षेच्या पेपर एक व पेपर दोनसाठी मिळून तब्बल 4 लाखपेक्षा जास्त अर्ज आले आहेत.
- दोन वर्षांनंतर परीक्षा-
शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन गेल्या दोन वर्षात झाले नव्हते. सन २०१८-१९नंतर आता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात, परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता व्यक्त आहे. इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे गुणवंत व कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे.परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
हेही वाचा - न्यायालयाने फेटाळला विनंती अर्ज, सचिन वाझेची तळोजा कारागृह रुग्णालयात रवानगी