मुंबई - मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. याआधीच महाविकास आघाडीने कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. यासाठी सरकारला इशारा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना पीककर्ज म्हणजे काय असते, हे समजावून सांगण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
अधिवेशनातील भाषणादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे सरकार घाबरट असल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांना गावाकडील गोष्टींची माहिती नसून त्यांना अद्याप एकर आणि हेक्टरमधील फरक देखील कळला नाही, असे ते म्हणाले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांचे विषय तसेच महिला सुरक्षेबाबत सरकारला धारेवर धरले. तसेच मित्रत्वाच्या नात्याने देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने राज्यभरात सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी धरणे आंदोलन पुकारले आहे. हा जनतेचा आक्रोश असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.
आज अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळल्याचे पाटील म्हणाले. यावर मुख्यमंत्री सभागृहातून पळून गेल्याचा टोला भाजपने लगावला.