मुंबई - गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, दोन दिवसापासून मुंबईत आणि राज्यात पावसाने जोरदार पुनरागम झाले आहे. काल शुक्रवारी संपूर्ण दिवस रिमझिम पाऊस मुंबईत सुरू होता. येत्या 24 तासांत मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच मुंबईत वातावरण ढगांमुळे काळसर झाले आहे. मुंबईत पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर आणि मुंबईच्या किनारपट्टीच्या भागात काळे ढग जमा झाले आहेत.
राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता -
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. राज्यात आणखी अशी काही ठिकाणे आहेत तिथे पाऊस कमी प्रमाणात झाला आहे. या ठिकाणी देखील चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातही सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ, नाशिक, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई पूर्व उपनगर आणि मुंबई शहरात रिमझिम पाऊस सकाळपासून सुरू आहे. येत्या काळात जोर वाढू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामानाचा अंदाज आणि इशारा -
- कोकण, मराठावाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ याठिकाणी 21 ऑगस्ट रोजी पाऊस मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- कोकण, मराठावाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ याठिकाणी 22 ऑगस्ट रोजची पाऊस मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
- कोकण, मध्यम महाराष्ट्र याभागात बहुतांश ठिकाणी 23 ऑगस्ट पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा - आपणच नियम करायचे आणि आपणच मोडायचे हे आमच्या रक्तात नाही-अजित पवार