मुंबई - गोदान एक्स्प्रेसची अलार्म चेन पुलिंग केल्याने टिटवाळा व खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर गोदान एक्स्प्रेस थांबली होती. तेव्हा मध्य रेल्वेचे सहाय्यक लोको पायलट, सतीश कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीच्या पुलावर उतरून गोदान एक्स्प्रेसची अलार्म चेन रीसेट केली. त्यानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक - आपत्कालीन परिस्थिती रेल्वे गाडी थांबविण्यासाठी रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, प्रवासी अलार्म चेन पुलिंगचा वापर स्थानकात उशीरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे/ चढणे इत्यादी शुल्लक कारणांसाठी करतात निदर्शनात येत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावरच मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.याशिवाय प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते. आज दुपारी ट्रेन क्रमांक 11059 गोदान एक्स्प्रेसमधील अज्ञान प्रवाशांने अचानक अलार्म चेन पुलिंग केल्याने टिटवाळा व खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर गोदान एक्स्प्रेस थांबली होती. त्यामुळे मागून येणाऱ्या रेल्वे गाड्या काही काळासाठी खोळंबल्या होत्या. यादरम्याम सहाय्यक लोको पायलट, सतीश कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून टिटवाळा व खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर थांबलेल्या गोदान एक्स्प्रेसची अलार्म चेन रीसेट केली. त्यानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय सहाय्यक लोको पायलट, सतीश कुमार यांच्या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रेल्वेचे प्रवाशांना आवाहन - अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलींग करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे अनावश्यक / गैरवाजवी कारणांसाठी अलार्म चेन पुलींगचा वापर करू नयेत असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहेत.