मुंबई - मुंबईमध्ये बोगस लसीकरण केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तसेच, बोगस लसीकरण करणाऱ्यांवर कारवाईही सुरू आहे. मात्र, यामध्येही काही घटना घडतच आहेत. अशीच एक घटना कांदिवलीत समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने लस घेतली नाही, तरीही या व्यक्तीला लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. या प्रकारबाबत त्या व्यक्तीने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. निलेश मिस्त्री असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. मिस्त्री यांना लसीचा डोस घेतला नसतानाही हे प्रमाणपत्र मिळाले आहे.
लस न मिळताच मिळाले प्रमाणपत्र
कोरोना विरोधात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम देशात आणि महाराष्ट्र राज्यात सुरू आहे. महाराष्ट्र राज्य लसीकरणात क्रमांकएक वर आहे. असे असले तरी, कुठेतरी काहीतरी गोंधळाची परिस्थिती आहेच. यामध्ये बोगस लसीकरणानंतर आता लस न मिळताच प्रमाणपत्र मिळाल्याचेही प्रकार घडत आहेत. याबाबत निलेश मिस्त्री या व्यक्तीने चारकोप पोलिस ठाण्यात आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली आहे.
'चारकोप पोलीस स्टेशनमध्ये दिली तक्रार'
निलेश मिस्त्री यांना लस घ्यायची होती. यासाठी त्यांनी नोंदणी केली. नोंदणी केल्यानंतर गुरुवारी सकाळी नऊ वाजता त्यांना स्लॉट मिळाला. खासगी रुग्णालयात त्यांनी पेड स्लॉट बुक केला होता. मात्र, काही कारणास्तव त्यांना रुग्णालयात जाऊन लस घेता आली नाही. मात्र, त्यांनी पुन्हा स्लॉट बुक करण्याचे ठरवले. परंतु, त्यांना लस घेण्याआधीच आपण लस घेतली आहे, असे प्रमाणपत्र मिळाले. या प्रकाराबद्दल मिस्त्री काही काळ चक्रावले होते. हे अस कस घडले. त्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेबद्दल चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.