मुंबई - शहर आणि उपनगरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दादर, माटुंगा, हिंदमाता, किंग सर्कल, गांधी मार्केट, अंधेरी, मालाड अशा काही मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सध्या ठप्प आहेत. चुनाभट्टी आणि सायन रेल्वे ट्रॅक जवळ पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी आणि कुर्ला ते सीएसएमटी या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
रेल्वेमुळे नागरिकांचे हाल होणार नाहीत -
पावसाळा सुरू झाला की मुंबई पाण्याखाली जाते हे चित्र प्रत्येक वर्षी दिसते. नुकताच मुंबईत तिसरा टप्प्यानुसार अनलॉक झाल्यामुळे लोक घराबाहेर पडू लागले आहेत. बसमध्ये शंभर टक्के प्रवासाला परवानगी असली तरी लोकल ट्रेन सध्या सामान्यांसाठी बंद आहेत. त्यामुळे दरवर्षी सारखे या पावसामुळे लोकल ट्रेन ठप्प होऊन सामान्य नागरिकांचे हाल होणार नाहीत. मात्र, बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या पावसाचा फटका बसू शकतो.
कवरील पाणी ओसरल्यानंतर रेल्वेसेवा पुन्हा होणार सुरू
आज पहिल्याच पावसात कामावर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे ठप्प झाल्याने गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेने ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहेत, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वे सेवा थांबवण्यात आली आहे. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यात येईल असे, मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
5 ते 6 तासांपासून पाऊस सुरू -
हवामान खात्याचा अंदाजा प्रमाणे मुंबई आणि उपनगर परिसरात बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या 5 ते 6 तासांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये नेहमीच्या प्रथेप्रमाणे पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. कामावर जाणार्यांसाठी निघालेल्या लोकांची या पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडताना दिसत आहेत. सायन, किंग सर्कल, हिंदमाता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.