मुंबई - मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. यामुळे सोमवार 5 ऑगस्ट रोजी पावसाच्या स्थितीनुसार मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर पुढील योजना आखल्या गेल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
उद्याच्या परिस्थितीनुसार मध्य रेल्वे उपनगरी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, ठाणे ते पनवेल आणि चौथ्या कॉरिडोरवरील खारकोपरपर्यंत या मार्गावर चालवण्यात येतील. हवामानातील परिस्थितीनुसार कल्याण ते बदलापूर आणि कसारा या मार्गावरील सेवा चालविण्याबद्दल सोमवारी सकाळी निर्णय घेण्यात येणार आहे.
दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र, ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सोमवारी बदलापूरच्या पलीकडे लोकल सेवा उपलब्ध नसतील. रेल्वे प्रशासन प्रवाशांसाठी योग्य त्या उपाययोजना करत असून मध्य रेल्वेला सहकार्य करावे आणि त्याप्रमाणे प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी केले आहे.