मुंबई - मध्य रेल्वेने एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवास्यांकडून 168.09 कोटी रूपये वसूल केले आहेत. मध्य रेल्वेने बोनाफाइड रेल्वे वापरकर्त्यांसाठी उत्तम सेवा पुरवण्याचा उपक्रम सुरू केला. याचसोबत विनातिकिट प्रवासाला आळा घालण्यासाठी नियमितपणे दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम राबवली. यामधून संबंधित दंड वसूल झाला आहे.
मागील वर्षी मध्य रेल्वेने 11.44 कोटी रुपये तर जानेवारी 2020 मध्ये 12.95 कोटी रुपये दंड वसूल केला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा फुकट्या प्रवाशांकडून करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईत 13.20 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जानेवारी 2019 मध्ये विना-बुक केलेल्या सामानासह विनातिकीट तसेच अनियमित प्रवासाची 2.51 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली होती. तर जानेवारी 2020 महिन्यात 2.82 लाख प्रकरणे नोंदवली असून यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत 12.35% वाढ झाली आहे. एप्रिल ते 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास आणि विना-बुक केलेल्या सामानाची एकूण 32.71 लाख प्रकरणे नोंदवली आहेत. तर मागील वर्षी याच काळात 29.56 लाख प्रकरणे आढळली होती.
एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत अशाच प्रकरणांमधून 168.09 कोटी रूपये वसूल करण्यात आले आहेत. तर मागील वर्षी याच काळात 147.00 कोटी रूपये मध्य रेल्वेने वसूल केले आहेत. यंदा यामध्ये 14.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी 2020 या कालावधीत आरक्षित प्रवासाच्या तिकिटांच्या हस्तांतरणाची 247 प्रकरणे आढळून आली आहेत. तर, दंड स्वरुपात 1.99 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.