मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Ex Home Minister Anil Deshmukh ) यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांची चौकशी ( 100 Crore Recovery Case ) सीबीआयमार्फत ( CBI Enquiry ) सुरु आहे. याप्रकरणी देशमुख यांच्या बंगल्यावर सुरक्षेसाठी असलेल्या ७ पोलीस कर्मचाऱ्यांचा जबाब सीबीआयने नोंदविला आहे.
गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. गृहमंत्री असताना देशमुख यांच्या सुरक्षेसाठी काही पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या सात कर्मचाऱ्यांना जबाबासाठी सीबीआयने बोलावले होते. त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.
सीबीआयने यापूर्वीही काही जणांचे जबाब नोंदविले आहेत. हे पूर्वीचे जबाब आणि पोलिसांनी दिलेले जबाब याची पडताळणी सीबीआयमार्फत होऊ शकते.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.