मुंबई - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांची 14 एप्रिल रोजी सीबीआयकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती. चौकशीच्या दहाव्या दिवशी म्हणजे 24 एप्रिलला सकाळी सात वाजता अनिल देशमुख यांच्या वरळीतील सुखदा या निवासस्थानी सीबीआयने सर्च ऑपरेशन केले. तसेच 7 वाजता त्यांच्या ज्ञानेश्वरी या शासकीय बंगल्यावर देखील सीबीआयची टीम पोहोचली. तब्बल सात तास सर्च ऑपरेशन केल्यानंतर सीबीआयच्या हाती काही दस्ताऐवज हाती लागल्याची माहिती आहे.
नेमके काय आहे प्रकरण -
मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि अंटिलिया कार स्फोटक प्रकरण या दोन्ही प्रकरणात मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल झाले. अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात तात्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. बदलीच्या नाराजीमुळे परमबीर सिंग यांनी एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. या पत्रात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप लावले. या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार, पब आणि रेस्टॉरंटमधून शंभर कोटी रुपये महिन्याला वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचे लिहिले होते. या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. सुप्रीम कोर्टाने ही याचिका मुंबई हायकोर्टाकडे पाठवली. मुंबई हायकोर्टाने आदेश देत सीबीआय चौकशी करण्याची सूचना केली. यानंतर अभिषेक दुलार यांच्या नेतृत्वात सीबीआयचे एक पथक मुंबईत दाखल झाले.
अभिषेक दुलार यांच्या नेतृत्वात आलेल्या टीम चौकशीला सुरुवात केली. शंभर कोटी वसुली प्रकरणात सीबीआय ने परमबीर सिंग यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. त्यासह 4 आस्थापनाच्या मालकांचे देखील स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये सचिन वाझे, संजय पाटील आणि राजू भुजबळ या पोलीस अधिकाऱ्यांची देखील नावे होती. सचिन वाझे मनसुख प्रकरणात एनआयएच्या कोठडीत होते. त्यामुळे कोर्टाची परवानगी घेऊन सचिन वाझे यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. त्यानंतर संजय पाटील आणि राजू भुजबळ यांचेही स्टेटमेंट सीबीआयकडून रेकॉर्ड करण्यात आले. 14 एप्रिला हजर राहण्याचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून समन्स पाठवण्यात आला. समन्स मिळाल्यानंतर अनिल देशमुख सकाळी दहा वाजता सांताक्रुज इथल्या डीआरडीओच्या गेस्ट हाउस मध्ये चौकशीसाठी हजर राहिले. रात्री नऊ वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. तब्बल अकरा तास अनिल देशमुख यांची चौकशी झाली. चौकशीनंतर ते गेस्ट हाऊस मधून बाहेर पडले तिथे उपस्थित असणाऱ्या माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
चौकशीच्या तब्बल दहा दिवसानंतर म्हणजे 24 एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर सीबीआयकडून दाखल करण्यात आला. अनिल देशमुख यांच्याशी निगडित असणाऱ्या दहा जागांवर सीबीआयकडून सर्च ऑपरेशन करण्यात आले. यात मुंबई येथे सुखदा सोसायटीत असणाऱ्या निवासस्थानी सकाळी 7 वाजता सीबीआयचे एक पथक पोचले, तर दुसऱ्या पथकानं अनिल देशमुख यांच्या न्यानेश्वरी या शासकीय बंगल्यावर धडक दिली. नागपूर इथल्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ही सीबीआयकडून सर्च ऑपरेशन करण्यात आले. सीबीआयकडून आवळलेला फास पाहता अनिल देशमुख यांची पुढची वाटचाल ही खडतर असणार हे नक्की.