मुंबई- देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची तब्बल 2 हजार 435 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयकडून सिजी पावर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन लिमिटेड या कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. खासगी कंपनीचे तत्कालीन सीएमडी गौतम थापर, तत्कालीन सीईओ माधव आचार्य, तत्कालीन सिएफओ हरिहरण व तत्कालीन संचालक ओमकार गोस्वामी यांच्यासह इतर व्यक्तीविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सीबीआयकडून नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये केवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे नव्हे तर ॲक्सिस बँक, येस बँक, कॉर्पोरेशन बँक बार्कलेज बँक, इंड्सलँड बँकसारख्या बँकांना कंपनीकडून हजारो कोटी रुपयांचा चुना लावण्यात आलेला आहे. या कंपनीच्या माध्यमातून एका बँकेकडून घेतलेले कर्ज बोगस व्यवहार दाखवून दुसऱ्या बँकेत वळविण्यात आले होते. तसेच बँकांकडून कर्ज घेण्यासाठी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये ही अनियमितता दाखवण्यात आलेली होती. बँकेकडून करण्यात आलेल्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टनंतर हा घोटाळा समोर आला आहे. यासंदर्भात सीबीआयकडून मुंबई, दिल्ली, गुडगाव सारख्या शहरांमध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे.