मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने मंत्रालयात पाच टक्केच अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच दरम्यान राज्यात संचारबंदीही सुरू झाल्याने मागील चार दिवसांपासून बंद असलेले मंत्रालयातील उपहारगृह आज सुरू झाले. यामुळे मंत्रालयात कर्तव्यावर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील चार दिवसांपासून मंत्रालयात कामावर येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपहारगृह बंद असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. जेवण, नाष्टा, चहाही मिळणे बंद झाल्याने अनेकांना याचा फटका बसला होता. मात्र आज मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेले उपहारगृह सुरू झाल्याने अनेकांनी मंत्रालय प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. या उपहारगृहातील चार कर्मचाऱ्यांनी आज येथे उपस्थित असलेल्यांना जेवणाची सोय केली आहे. तर दुसरीकडे सर्वात जास्त अडचणीत असलेल्या पोलिसांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.