मुंबई - कॅबिनेट मंत्री नवाब मलिक जे जे रुग्णालयात भर्ती करण्यात ( Cabinet Minister Nawab Malik JJ hospitalized ) आले आहे. नवाब मलिक यांच्या वकीलांनी काही मिनिटापूर्वी विशेष न्यायधीश आर. एन. रोकडे यांच्या कोर्टा समोर ही माहिती दिली आहे. मलिक यांना किडनीचा त्रास असून त्यांनी उपचारासाठी मेडिकल आधारावर जामीन देण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र अजून त्यांचा अर्ज न्यायालयात विचाराधीन आहे. मलिक यांच्या मेडिकल जामीन अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची त्यांच्या वकिलांची मुंबई सत्र न्यायालयात मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना आर्थर रोड जेल मधून उपचाराकरिता जेजे रुग्णालयात भती करण्यात आले, असल्याची नवाब मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी आज सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात माहिती दिली आहे.
खाजगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगीची मागणी - कॅबिनेट मंत्री नवाब मलिक गेल्या तीन दिवसांपासून आजारी आहेत, त्यांना ताप, थंडी, लूज मोशन सुरू असल्याने आज सकाळी त्यांना व्हीलचेअरवर तातडीने जे जे रुग्णालयात भती करण्यात आले असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या किडनीवर शस्त्रक्रिया करीता मुंबई सत्र न्यायालयात वैद्यकीय जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज ईडीकडून उत्तर सादर करण्यात आले. त्यावेळी नवाब मलिक यांच्या वकीलांकडून ही माहिती न्यायालयाला देण्यात आले तसेच नवाब मलिक यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्याकरिता न्यायालयाने तातडीने परवानगी देण्यात यावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
जामीन अर्जावर 5 मे रोजी मुंबई सत्र न्यायालय निर्णय - नवाब मलिक यांच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता ईडीने कुठलाही विरोध दर्शवला नाही. परंतु जेजे रुग्णालयाच्या अहवालानुसार जर आवश्यक असल्यास त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात यावे, असे ईडीच्या वकिलांकडून सांगण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने 5 मे पर्यंत जेजे रुग्णालयातील अधिकाऱ्यांना नवाब मलिक यांच्या आरोग्य संदर्भातील अहवाल न्यायालयात पाठविण्याचे निर्देश केले आहे. तसेच ईडी देखील नवाब मलिक यांच्या आरोग्य संदर्भातील सप्लीमेंट्री अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. आता या अर्जावर 5 मे रोजी मुंबई सत्र न्यायालय निर्णय देणार आहे.
या प्रकरणात केली होती अटक - कुर्ला येथील जमीन व्यवहारात अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर सोबत झालेल्या आर्थिक व्यवहारात प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती तेव्हापासून नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात किडनीच्या शस्त्रक्रिया करिता जामीन अर्ज दाखल केला आहे आज झालेल्या सुनावणी वेळी मुंबई सत्र न्यायालयाने ईडीला जामीन अर्जावर सोमवार पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. नवाब मलिक यांनी यापूर्वी ईडी कडून करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने नवाब मलिक यांना कुठलाही अंतरिम दिलासा दिला नव्हता तर रेगुलर सुनावणी केल्यानंतर याचिकेवर निर्णय देण्यात येईल असे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने म्हटले होते त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्याठिकाणी देखील नवाब मलिक यांना कुठलाही दिलासा न देता सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती त्यानंतर नवाब मलिक यांनी आता वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या टीकेला अमृता फडणवीसांचा खोचक टोला, 'आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीश...'