मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर सेना आणि भाजपात शाब्दिक वादाला तोंड फुटलंय. आता यामध्ये राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी उडी घेत विरोधीपक्षाला लक्ष केलं आहे. महाराष्ट्रातील एक मंत्री तुरुंगात जाणार असल्याचे वक्तव्य भाजपा नेते करत आहेत. मात्र त्यांनी जास्त टरटर करू नये, मर्यादेत राहून भाषेचा उपयोग करावा, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
टरटर करून आकाश फाटत नाही
रविवारी(25 ऑक्टोबर) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला आरसा दाखवण्याच प्रयत्न केला. विविध विषयांवर भाष्य करत त्यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच भाजपा नेत्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले, असे सांगून त्याबाबत दाखले दिले. यानंतर भाजपा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. यावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी देखील टीका केली आहे. भाजपाचे नेते महाविकास आघाडीतील नेत्यांबद्दल व मुख्यमंत्री यांच्याबद्दल काही पण बोलत राहतात. त्यांना कळलं पाहिजे, टरटर करून आकाश फाटत नाही. पाऊस पडणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले. तसेच राज्यपाल व भाजपा नेते नेते लोकांची दिशाभूल कशी करत आहेत हे मुख्यमंत्र्यांनी उघडपणे लोकांसमोर मांडल्याचे मलिक यांनी म्हटले.
अजून विचारधारा सोडली नाही
महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांची विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाहीत. 'धर्माच्या आधारावर राजकारण करणे, हा आमचा कार्यक्रम नाही. भाजपा धर्माच्या आधारावर राजकारण करून मतांचे ध्रुवीकरण करते, हे लोकांना माहिती आहे, असे म्हणत मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
भाजपने राष्ट्रवादीलाही केले होते लक्ष
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष केले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे धर्मनिरपेक्ष झालात का असा प्रश्न भाजपकडून उपस्थित करण्यात आला होता. शिवाय दोन्ही काँग्रेसमुळे 'उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व भेसळयुक्त झालंय' असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता.