मुंबई - काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर व अविनाश महातेकर यांना देण्यात आलेल्या मंत्रीपदाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग यांच्यासमोर सुनावणी होत आहे. त्यामुळे या प्रकरणी आज (बुधवारी) निकाल येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - काँग्रेसच्या मंचावर गृहनिर्माण मंत्री विखे-पाटील अन् पालकमंत्री फुकेंची उपस्थिती; चर्चांना उधाण!
विरोधी याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. सतीश तळेकर यांनी म्हटले आहे, की एखाद्या व्यक्तीला अत्यंत अपवाद वगळता असे कोणालाही मंत्री करता येत नाही. दुसऱ्या पक्षातील मातब्बर नेत्यांना प्रलोभन देत आपल्या पक्षात घेऊन मंत्रीपदी बसवणे ही काही अपवाद परिस्थिती नाही. अशा प्रकरणात संबंधित व्यक्ती ६ महिन्यात निवडून यावी लागते. पण आता निवडणूकच होणार नसेल तर मग हा केवळ राजकीय भ्रष्टाचार आहे, असा आरोप अॅड. सतीश तळेकर यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर व अविनाश महातेकर हे सध्या विधिमंडळातील कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांची मंत्रीपदावर निवड ही घटनेविरुद्ध आहे. विखे-पाटील यांनी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा दिल्याने हा लोकशाहीचा राजकीय भ्रष्टाचार आहे, असे सतीश तळेकर यांनी म्हटले आहे.