मुंबई - 'दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’मार्फत (आयसीएआय) घेण्यात आलेल्या 'चार्टर्ड अकाउंटन्ट्स' (सीए) परिक्षेचा अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून १५.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. देशातून कोलकाता येथील अभय बजोरिया आणि नोएडातील सुर्यांश अगरवाल हे दोघे जण देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुलुंडचा धवल चोप्रा देशातून तिसरा आला आहे.
हेही वाचा... 'चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो'
'सीए'साठी घेण्यात आलेल्या परीक्षेला देशभरातून १५,००३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २,२६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी १५.१२ टक्के इतकी आहे.
देशात प्रथम आलेल्या अभय बजोरिया आणि सुर्यांश अगरवाल यांना ८०० पैकी ६०३ गुण (७५.३८ टक्के) मिळाले आहेत. कोलकात्याचाच ध्रुव कोठारी ८०० पैकी ५७७ गुण (७२.१३ टक्के) मिळवून दुसरा आला. अहमदाबादच्या दर्शन शहा याने ८०० पैकी ५७५ गुण (७१.८८ टक्के) मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. सनदी लेखापालच्या अंतिम परिक्षेत नाशिकचा कुशल संतोष लोढा याचा संपू्र्ण भारतात पाचवा क्रमांक आला आहे. तर यंदा जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला एकूण ८,०२१ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात उत्तीर्णतेची टक्केवारी १०.१९ आहे.
हेही वाचा... करीम लाला आणि इंदिरा गांधी यांची भेट ठरवून झाली नाही - बलजीत परमार
देशात तिसऱ्या आलेल्या मुलुंड येथील धवल चोप्रा यांनी, 'आपण नुकतेच एलएलबीची परिक्षा उत्तीर्ण झालो होतो आणि आज सीएची परीक्षा उत्तीर्ण झालो'. याचा खूपच आनंद होत असल्याचे धवलने सांगितले. देशातून तिसऱ्या क्रमांकावर येईन, असा आपल्याला विश्वास नव्हता. परंतु एलएलबीचा अभ्यास करताना याकडेही लक्ष दिले होते. यासाठी आई-वडिलांचे खूप मार्गदर्शन लाभले असल्याचे धवल चोप्रा म्हणाला. धवल याने नुकतीच शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.