मुंबई - "झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी" या ग. दि. माडगूळकर यांच्या कवितेतून आपल्या डोळ्यापुढे उभी राहणारी 'रेल्वे गाडी' हा लहानथोरांच्या आवडीचा विषय. हीच रेल्वे मुंबईसारख्या शहराची जीवनवाहिनी म्हणून देखील ओळखली जाते. त्यातील एका रेल्वेची प्रतिकृती मुंबई महापालिकेने साकारली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या जवळ असणारे प्रवेशद्वार आणि भुयारी मार्गालगत महापालिकेचा अवघ्या १६१ चौरस फुटांचा एक छोटासा भूभाग आहे. याच छोट्या भूभागावर टाकाऊ वस्तूंपासून महापालिकेच्या उद्यान खात्याने एक रेल्वे गाडी साकारली आहे. विशेष म्हणजे लहान थोरांच्या आकर्षणाचा विषय ठरत असलेल्या या गाडीचे नाव बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ( Brihanmumbai Municipal Corporation ) उद्यान खात्याने अत्यंत कल्पकतेने 'उद्यान एक्सप्रेस' असेच दिले ( BMC Udyan Express ) आहे.
मृत झालेल्या माडाच्या झाडाच्या खोडापासून ही रेल्वेची प्रतिकृती उद्यान खात्याच्या कर्मचार्यांनी साकारली आहे. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेच्या 'ए' विभाग उद्यान खात्यातील माळी रविंद्र शिंदे व संदीप कुंभार यांनी अथक मेहनत करुन ही प्रतिकृती साकारली आहे. यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही 'उद्यान एक्सप्रेस' ज्या छोट्या भूखंडावर प्रदर्शित करण्यात आली आहे, त्याच भूखंडाचे आकर्षक सुशोभीकरण देखील उद्यान खात्याने केले आहे.
भूखंडावर सुशोभीकरण
या भूखंडावर करण्यात आलेल्या सुशोभीकरणाचा भाग म्हणून या ठिकाणी 'जंपिंग ग्रास' या नावाच्या गवताची आकर्षक हिरवळ काळजीपूर्वक जोपासण्यात आली आहे. त्याचबरोबर 'एक्झोरा' सारखी शोभेची झाडे देखील या ठिकाणी लावण्यात आली आहेत. तसेच, महत्त्वाची बाब म्हणजे या इवल्याश्या भूखंडावर चाफ्यासह 'कॉर्डिया सबेस्टेना'नावाची दोन शोभेची झाडे देखील लावण्यात आली आहेत. यंदाच्या वसंत ऋतूत ही झाडे बहरलेली असल्याने सध्या अनेकदा या 'उद्यान एक्सप्रेस' भोवती फुलांचा आकर्षक सडा पडलेला दिसून येतो. त्याच पाठोपाठ या 'उद्यान एक्सप्रेस' ला आपल्या 'मोबाईल' मध्ये टिपण्यासाठी नागरिकांची लगबग देखील दिसून येतेय.
हेही वाचा - Mathadi Worker Agitation : नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा