मुंबई - अल्पवयीन 13 वर्षीय मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी कुर्ल्यातील नेहरू नगर येथील आरोपी सोनू करमाळीला मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Session Court) विशेष पोक्सो कोर्टाने आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टीकोनातून कोणतेही स्थान नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे.
काय आहे प्रकरण - अल्पवयीन पीडित मुलगी आणि आरोपी सोनू करमाळी हे दोघेही मित्र होते. आरोपीने आपले पहिले लग्न झाले असल्याचे पीडितेपासून लपवले होते. 2019 मध्ये पीडित मुलगी आणि तिच्या आईमध्ये काही कारणावरून झालेल्या भांडणानंतर पीडित मुलीने मित्र आरोपी सोनू करमाळी याला फोन केला व नंतर ते भेटले. त्यानंतर ते दोघे त्याच्या मित्राच्या घरी राहायला गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तिथून निघाले व नंतर झारखंडला गेले. तिथे गेल्यानंतर पीडित मुलीला माहिती झाले की आरोपी सोनू करमाळीचा यापूर्वी देखील विवाह झालेला आहे. त्याच्या पूर्व पत्नीने देखील त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पीडित मुलीने झारखंड येथील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला आणि सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आरोपीला झारखंड पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर मुलगी आणि आरोपीला कुर्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी 2 जून 2019 रोजी बेपत्ता झाल्यानंतर दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर झारखंड पोलिसांनी मुलीला १८ जून २०१९ रोजी पोलीस ठाण्यात आणले होते.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मुलगी आठवी इयत्तेत शिकत होती. आसपासच्या परिसरात शिकवणी वर्गात जात असे. क्लासेसच्या समोर एक हॉटेलमध्ये आरोपी काम करायचा. हॉटेलमध्ये मुलगी आरोपीच्या संपर्कात आली. दोघांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केल्याचे सांगण्यात आले. 2 जून 2019 रोजी तिचे तिच्या आईसोबत भांडण झाले होते. त्यामुळेच ती घरातून निघून गेली होती. आरोपीला भेटायला गेली होती ज्याला तिने तिचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले. दोघे वाशी येथील करमाळीच्या मित्राच्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी ते चेंबूरला गेले तिथे मुलीने तिची सोनसाखळी विकली. दोघांनी चित्रपट पाहिला आणि कोकणातील गणपतीपुळे व कोल्हापूर येथे गेले. यानंतर आरोपीने तिला झारखंड येथील त्याच्या मूळ गावी नेले. मुलीने दावा केला की हे सर्व असताना दोघांमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. झारखंडमधील करमाळीच्या घरी पोहोचल्यावर मुलीला कळले की तो विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध आधीच गुन्हा दाखल केला आहे. तिने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर झारखंड पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेऊन मुंबईत आणले.
असा झाला युक्तिवाद - खटल्यादरम्यान सरकारी वकील प्रांजली जोशी यांनी सहा साक्षीदार तपासले, ज्यात पीडिता, तिचे वडील, एक वैद्यकीय अधिकारी आणि खटल्यातील तपास अधिकारी यांचा समावेश होता. करमाळीविरुद्धचा खटला सिद्ध करण्यासाठी तपासण्यात आले होते. आरोपीच्यावतीने वकील अंजली पाटील यांनी दोघांमधील संबंध सहमतीने होते. मुलीने स्वतःच्या इच्छेने तिच्या आई वडिलांचे घर सोडून आरोपीमध्ये सामील झाल्याचा युक्तिवाद केला.
आरोपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा - विशेष न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. ती एक मूल असल्याने POCSO कायद्याच्या कलम 2(d) अंतर्गत विचार केल्याप्रमाणे अल्पवयीन मुलीने संमती देणे कायद्याच्या नजरेत स्थान नाही. याउलट आरोपीने संबंधित वेळी व तारखेला आणि ठिकाणी मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली, असे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे आरोपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.