मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बांद्रा पोलिसांकडून रिया चक्रवर्तीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर तो सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. याविरोधात सुशांतसिंह राजपूतची बहीण मीतू सिंह व प्रियांका सिंह या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्यावर दाखल गुन्हा काढून टाकावा म्हणून याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होत मुंबई उच्च न्यायालयाने मीतूवर लावण्यात आलेले आरोप काढले असून, प्रियांका सिंहला कुठलाही दिलासा मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेला नाही.
प्रियांका सिंहला दिलासा नाही
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस एस शिंदे व न्यायाधीश एम एस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भात सुनावणी घेत सुशांतसिंह राजपूत प्रकरणात प्रियांका सिंहवरील गुन्हा कायम ठेवला आहे. तर, मीतू सिंहला यातून वगळले आहे या दोघांकडूनही त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. सुशांतसिंह राजपूत याची मैत्रीण रिया चक्रवर्तीकडून मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात प्रियांका सिंह, मीतू सिंह व दिल्लीतील डॉक्टर तरुण कुमार या तिघांविरोधात बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शनच्या माध्यमातून सुशांतसिंहवर औषध उपचार केल्याचा आरोप करण्यात आलेला होता. त्यानुसार बांद्रा पोलिसांनी 7 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी नियमानुसार सीबीआयकडे वर्ग केला होता.