मुंबई - बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक मुश्ताक नाडियादवाला यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांना पाकिस्तानमधील पत्नीच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवले आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यामध्ये नाडियादवाला यांच्या कुटुंबीयांना शोधण्याकरिता केंद्रीय परराष्ट्र विभागाने पुढाकार घ्यावा तसेच त्यांना शोधण्याकरिता याचिकाकर्त्याला या ठिकाणावरून त्या ठिकाणी हेलपाटे घालायला लावू नका असे मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय परराष्ट्र विभागाला म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने म्हटले आहे की MEA ने या प्रकरणाला प्रतिकूल मानू नये. तसेच यामध्ये सहकार्य करायला पाहिजे आणि समस्येचे निराकरण झाले की नाही याची खात्री देखील करायला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्याने याचिकाकर्त्याला उत्तर का दिले नाही? याचिकाकर्त्याला MEA मध्येच एका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का हेलपाटे घालावे लागत आहेत, असे देखील कोर्टाने म्हटले आहे. फक्त फोन उचला आणि संबंधित अधिकाऱ्याशी बोला आणि मुले कुठे आहेत ते पहा असेही कोर्टाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती डेरे म्हणाल्या किमान काही संपर्क क्रमांक किंवा ईमेल शोधा जेणेकरून याचिकाकर्ता नाडियाडवाला आणि त्यांच्या मुलांमध्ये संवाद साधता येईल. MEA ला याचिकेला प्रतिसाद देण्याचे आणि योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले. या प्रकरणावर पुढील सुनावणी 21 सप्टेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पी के चव्हाण यांच्या खंडपीठासमोर नाडियादवाला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. ज्यात त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांचे सुरक्षित परत येण्यासाठी सरकारला निर्देश द्यावेत, असे म्हटले होते. उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाला या याचिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. MEA च्या मुख्य पासपोर्ट आणि व्हिसा कार्यालयातील अधिकाऱ्याला नाडियादवाला यांना भेटण्याचे निर्देश दिले होते.
सोमवारी नाडियादवाला यांचे वकील बेनी चटर्जी यांनी खंडपीठाला सांगितले की सीपीव्हीच्या संयुक्त सचिवांना एक ईमेल पाठवण्यात आला होता. ज्यांनी उत्तर दिले की हे प्रकरण MEA च्या ओव्हरसीज इंडियन अफेअर्स विभागाच्या कक्षेत येते. 2 सप्टेंबर रोजी या विभागाला मेल लिहिला होता. परंतु अद्याप उत्तर मिळालेले नाही असे चटर्जी म्हणाले. वकील आशिष चव्हाण यांनी MEA तर्फे हजर राहून सूचना मागण्यासाठी आणखी वेळ मागितला.
काय आहे प्रकरण - मुश्ताक नाडियाडवाला यांनी पाकिस्तानी नागरीक मरियम चौधरी यांच्याशी साल 2012 मध्ये विवाह केला. कालांतराने मरियम यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही केला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये मरियम आपल्या आजारी पालकांना भेटण्यासाठी दोन्ही मुलांसह पाकिस्तानला गेल्या. पण अचानक तिने फेब्रुवारी 2021 मध्ये आपल्या मुलांच्या एकल पालकत्वासाठी लाहोर कोर्टात याचिका दाखल केली आणि कोर्टानं ती मान्यही केली. अचानक आपल्या बायकोचं हे मतपरिवर्तन का झालं? याची काहीही कल्पना नाही. मात्र ती आता मुलांसह भारतात येण्यास तयार नाही. तिचे आईवडील तिथले वजनदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांनीच तिच ब्रेनवॉश केलं असावं असा आरोप या याचिकेतून नाडियाडवाला यांनी केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत पाकिस्तान अडकलेल्या आपल्या कुटुंबियांना तात्काळ भारतात आणण्याची नाडियाडवाला यांनी प्रमुख मागणी केली आहे. आपला 9 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी त्यांच्या आईसोबत पाकिस्तानात अडकले आहेत. मुलांचे पासपोर्स संपलेत त्यामुळे त्यांना आता मायदेशात परत आणणं ही भारत सरकारची जबाबदारी आहे, असा दावा केला आहे. याबाबत वारंवार संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर कोर्टात दाद मागत असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.