मुंबई - मुंबईत चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन पोलिसांना आल्याने खळबळ उडाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत इतकंच सांगून संबंधित व्यक्तीने फोन ठेवून दिला होता. त्यानुसार या सर्व ठिकाणी मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली. सीएसएमटी स्टेशनवर प्रवाशांना कुठलाही त्रास न होऊ देता ही शोधमोहीम सुरु करण्यात आली. मात्र शोध मोहीम आणि तपासाअंती फोन वरून मिळालेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या अफवेच्या कॉल प्रकरणी पोलिसांनी जालन्याच्या दोन जणांना ठाण्यातून ताब्यात घेतले आहे.
पार्टी करताना केला कॉल-
राजू कांगणे आणि रमेश शिरसाट अशी दोघांची नावं आहेत. शुक्रवारी कल्याण जवळ हे दोघेही पार्टी करत बसले होते, आणि पार्टीच्या दरम्यान या दोघांनी पोलिसांना फोन करून चार जागी बॉम्ब ठेवले असल्याची माहिती दिली होती,असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस नियंत्रण कक्षामध्ये शुक्रवारी रात्री कॉल आला होता. त्यावरून बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी तपासणी अंती फोनवरून निनावी व्यक्तीने दिलेल्या माहितीमध्ये तथ्य नसून ती अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी त्या फोन करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला. बॉम्ब ठेवल्याची अफवेचा फोन कॉल केल्या प्रकरणी पोलिसांनी फोन कोणत्या भागातून आला होता, त्याचा शोध घेऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ते दोघे जालन्याचे रहिवासी असून त्यांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. त्या खोट्या कॉल संदर्भात सध्या मुंबई पोलिसांकडून त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती क्राईम ब्रँचकडून देण्यात आली आहे.
सीएसएमटीमध्ये सर्व वस्तुंची कसून तपासणी -
मुबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची धक्कादायक माहिती एका निनावी फोनद्वारे रेल्वे विभागाला मिळाली होती . त्यानंतर तात्काळ रेल्वे स्थानकावर बॉम्ब स्कॉड पथक दाखल झाले, शोध मोहीम सुरू करून खात्री करण्यात आली. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली होती. पोलिसांनी स्थानकातील सर्व स्वच्छतागृह , खानपान स्टॉप यापासून तिकीट घर आदींची कसून तपासणी केली. मात्र फोन कॉलवरील माहितीनुसार सुरक्षा दलांनाकाहीच आढळून आले नाही. रेल्वेच्या सेवेवर याचा परिणाम झाला नसून गाड्या वेळेनुसार सोडल्या जात आहेत.
मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आला होता. महत्वाची बाब म्हणजे ज्या नंबरवरुन हा फोन कॉल आला होता त्याला परत फोन लावल्यावर माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका, असं तो व्यक्ती म्हणाला होता. त्यानंतर त्याने आपला फोन बंद करुन ठेवला. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यास अडचण येत होती अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रेल्वे विभागाला एक निनावी फोन आला. त्या व्यक्तीने सीएसएमटी, दादर, भायखळा, आणि अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याची माहिती त्या व्यक्तीने दिली. त्यानंतर रेल्वे विभागाकडून ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक चारही ठिकाणांवर दाखल झालं. गेल्या दीड तासापासून या चारही ठिकाणी बॉम्ब शोधक पथकाकडून तपास सुरु आहे. मात्र, अद्याप कोणतीही स्फोटक वस्तू दिसून आलेली नाही. त्यामुळे ही कुणीतरी अफवा उठवण्यासाठी कॉल केला असण्याची शक्यता व्यक्त करत त्याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर लोकशन ट्रेस करून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.