मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार गेले वर्षभर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची कमतरता भासली होती. त्यासाठी मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी तब्बल १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी बनावटीच्या एका कॉन्सन्ट्रेटरसाठी ७९ हजार खर्च केला जाणार असून बाजारभावापेक्षा प्रत्येकी तब्बल १५ ते २० हजार रुपये अधिक दराने ही खरेदी करणार आहे.
हेही वाचा - मुंबई पेट्रोलच्या दराने ओलांडले शतक; सामान्यांच्या खिशाला कात्री
१० कोटी ४२ लाखांचा खर्च -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढणा-या रुग्णसंख्येचा विचार करून पालिकेने प्रती मिनिट दहा लिटर क्षमतेचे १२०० काॅन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीसाठी श्रद्धा डिस्ट्रिब्युटर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पालिका यासाठी कंत्राटदाराला १० कोटी ४२ लाख रुपये मोजणार आहे. पहिल्या टप्प्यात ३०० काॅन्सन्ट्रेटरचा पुरवठा २६ मेपर्यंत केला जाणार असल्याचे वितरकाने पालिकेला कळवले आहे. प्रस्ताव शुक्रवारी २८ मे रोजी मंजूर झाल्याने पुरवठा कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
चढ्या दराने खरेदी -
चीनी बनावटीचे हे काॅन्सन्ट्रेटर असून प्रशासनाने चढ्या दराने खरेदी केले असल्याचा दावा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी चीनी बनावटीचे काॅन्सन्ट्रेटर ३० ते ४५ हजारांपर्यंत मिळत होते. तसेच नामवंत कंपन्यांचे काॅन्सन्ट्रेटर मिळत असताना पालिकेने चढ्या दराने खरेदी केले असल्याचा आरोप राजा यांनी केला आहे.
१२ ठिकाणी ऑक्सिजन प्लान्ट -
फेब्रुवारीच्या मध्यात मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान रोज २३५ मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासली होती. यापुढेही तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लाटेदरम्यान ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून महापालिकेने १२ ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्लान्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता १२०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार आहेत.
हेही वाचा - कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी धोरण निश्चित करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश