मुंबई - भाजपा नगरसेवकाला धमकावल्या प्रकरणी भाजपाने मुंबई पोलिसांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत यांनी भाजपाचे आरोप खोडून काढत, माझ्या बदनामीसाठी भाजपा चुकीचे आरोप करत आहे. परंतु, माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास असून ते योग्य कारवाई करतील, असे जाधव म्हणाले. त्यामुळे सेना-भाजपामधील आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्हॉट्सअॅपवर अर्वाच्य, अश्लील संभाषण करून धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेऊन यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करावी, तसेच मिश्रा यांच्या सुरक्षेची मुंबई पोलिसांनी काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
मला बदनामी करण्यासाठी खोडसाळपणा-
भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांना कुठलीही धमकी दिलेली नाही. हे मी पुराव्यासह सांगितले आहे. संपूर्ण ठरवून त्यांनी संभाषण केले आहे. ते का केले? कशासाठी केले? हे मला माहीत नाही. परंतु, भाजपाने केलेले आरोप चुकीचे, खोडसाळ आणि मला बदनाम करण्यासाठी केले जात आहेत, असा आरोप स्थायी समिती यशवंत जाधव यांनी केला आहे. तसेच मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास असून ते भाजपाच्या तक्रारीची दखल घेवून योग्य ती कारवाई करतील, असेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
यावरून झाला वाद
मुंबईतील विकास कामांसाठी निधी वाटप करताना स्थायी समिती अध्यक्ष यांच्या प्रभाग क्रमांक २०९ मध्ये ३३ कोटी त्यापैकी ज्यूटच्या पिशव्यांसाठी दीड करोड, ३० खाद्य आणि भाजी ट्रकसाठी ५ करोड, व्यायाम शाळा साहित्यासाठी २ करोड, संगणकासाठी १ करोड आणि अन्य अवाजवी निधीची तरतूद केली आहे. याबाबत भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा यांनी कॅगला लेखी तक्रार करून सदरबाबत महापालिका निधीचा नियमबाह्य दुरुपयोग आणि केवळ एकाच प्रभागात मतदारांना चुकीच्या पद्धतीने मोफत गोष्टींचे वितरण करणे प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.